परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांची कबुली
पाकिस्तानला एफ १६ विमाने नाकारण्यात आल्याने अमेरिकेबरोबरच्या संबंधांना ओहोटी लागली आहे. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला लष्करी मदतीअंतर्गत ही विमाने देण्यास नकार दिल्याने त्याचा वाईट परिणाम दोन्ही देशांतील संबंधावर झाल्याची कबुली पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या सिनेटमध्ये बोलताना अझीझ यांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तान-अमेरिका संबंध तणावाच्या सावटाखाली आहेत, त्याला कारण एफ १६ विमाने पाकिस्तानला देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शवली आहे. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला एफ १६ विमाने लष्करी मदतीपोटी देण्यास विरोध केला. त्यामुळे अनुदानित दरात ही विमाने पाकिस्तानला मिळण्याची शक्यता मावळली आहे. भारतामुळेही हा परिणाम झाला असल्याचे अझीझ यांनी तीनदा त्यांच्या भाषणात सांगितले. भारतीय दबाव गटाने पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्याचा निर्णय अमेरिकेला फिरवायला लावला, सिनेटर रँड पॉल यांच्या ठरावाच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला मिळणारी एफ १६ विमाने रोखली आहेत. भारताने जे आक्षेप घेतले होते त्याला पाकिस्तानने कसून विरोध केला होता. अमेरिकेने सुरुवातीला आठ एफ १६ विमाने भारताला देण्याचे कबूल केले होते. अमेरिकेचे संरक्षण मंत्री अ‍ॅशटन कार्टर यांनी भारत दौऱ्यात अनेक करार केले होते त्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
दक्षिण आशियात संरक्षण समतोल राखण्यासाठी पाकिस्तानला एफ १६ विमाने देणे महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. अमेरिकेतील भारतीय दबाव गट पठाणकोट येथील १ जानेवारी २०१६च्या हल्ल्यानंतर जास्तच सक्रिय झाला आहे असे सांगून अझीझ म्हणाले, की विकिलिक्स, रेमंड डेव्हिस व अबोटाबाद कारवाई यामुळे २०११पासूनच अमेरिका-पाकिस्तान संबंधांना ओहोटी लागली होती. २०१३ नंतर दोन्ही देशांतील संबंध परत सुधारले होते.
पाकिस्तानने त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. डॉ. शकील आफ्रिदी यांनी सीआयएला ओसामा बिन लादेनला शोधण्यास केलेली मदत व हक्कानी नेटवर्क विरोधातील कारवाई तसेच अण्वस्त्रांचा प्रश्न यावर अमेरिका व पाकिस्तान यांच्यात मतभेद होते.