गेल्या काही महिन्यांत भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर चीनबाबत भारतात संशयाचं आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. याच पार्श्वभूमीवर केलेल्या तपासामध्ये भारत सरकारनं १५० हून अधिक चीनी मोबाईल अॅप्सवर भारतात बंदी घातली. त्यात अनेक सोशल मीडियाचे देखील अॅप्स होते. मात्र, आता त्यानंतर भारताकडून चीनी मोबाईल कंपन्यांवर देखील करडी नजर ठेवली जाणार आहे. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार भारत सरकारकडून चीनी मोबाईल कंपन्यांकडून त्यांनी वापरलेले भाग आणि मोबाईलमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल करण्यात आलेले सॉफ्टवेअर्स यांच्याविषयी माहिती मागवली जाण्याची शक्यता आहे.

चीनच्या आक्रमक धोरणाामुळे भारत सरकार सतर्क

देशातील नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा किंवा त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना असल्यामुळे आणि त्यातील काही प्रकरणांमध्ये तो सिद्ध देखील झाल्यामुळे चीनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ याच मुद्द्यावरून आता भारतात मोबाईल विक्री करणाऱ्या चीनी मोबाईल कंपन्यांकडे संशयाची सुई वळली आहे. त्यासोबतच ईशान्येकडील सीमाभागात चीनकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आगळिकीमुळे देखील भारतानं चीनी उत्पादनांच्या बाबतीत सावध पावलं टाकण्याचं धोरण स्वीकारल्याचं बोललं जात आहे.

मोबाईल पार्ट्सचीही होणार संपूर्ण तपासणी!

भारतामध्ये मोबाईल विक्री करणाऱ्या चीनी कंपन्यांमध्ये शाओमी, रेडमी, पोको, रिअलमी, वीवो यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मोबाईलमध्ये आधीच इन्स्टॉल करण्यात येत असलेल्या अॅप्लिकेशन्सची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, या मोबाईल कंपन्या ज्या इतर कंपन्यांकडून मोबाईलसाठीचे भाग विकत घेतात, त्यांची देखील यादी जमा करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

…तर चीनला घाबरण्याचं कारण नाही

दरम्यान, यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारे कंपन्यांना भिती घालण्याचा प्रयत्न नसून सुरक्षेची पूर्णपणे खातरजमा करणे हा यामागचा उद्देश असल्याची भूमिका सरकारकडून घेण्यात आली आहे. जर चीनी कंपन्यांना त्यांच्या उत्पादनात कोणताही दोष नसल्याची खात्री असेल, तर त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, अशी भूमिका भारत सरकारकडून मांडली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.