India Medical Aid To Iran: युद्धग्रस्त इराणला भारताने मदतीचा हात दिला आहे. भारताने इराणला वैद्यकीय मदत पाठवली असून, औषधांची पहिली खेप इराणी रेड क्रेसेंट सोसायटीला सुपूर्द करण्यात आली आहे. भारतातील इराणच्या दूतावासाने याबाबत माहिती दिली आहे. “आम्ही भारतातील लोकांचे मनःपूर्वक आभार मानतो,” अशा शब्दात दूतावासाने भारताचे आभार मानले आहेत.

युद्धकाळात महत्वाची मदत

अमेरिका आणि इस्रायलविरोधात संघर्ष सुरु असलेल्या इराणाला भारताने वैद्यकीय मदत देऊ केली आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून भाराताने इराणसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गेल्या काही वर्षात भारत जगभरात विविध देशांना वैद्यकीय मदत पाठवत आला आहे. युद्धामुळे विविध अडचणींचा सामना करणाऱ्या इराणसाठी भारताकडून मिळालेली मदत मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. याबाबत इराणने देखील भारताचा आभार मानले आहेत.

इराणी दूतावासाकडून व्हिडीओ प्रसिद्ध

भारताने देऊ केलेल्या वैद्यकीय मदतीचा व्हिडीओ इराणी दूतावासाने प्रसिद्ध केला आहे. “भारताकडून देण्यात आलेली वैद्यकीय मदतीची पहिली खेप इराणी रेड क्रेसेंट सोसायटीला सुपूर्द करण्यात आली आहे. आम्ही भारतातील लोकांचे मनःपूर्वक आभार मानतो,” अशा शब्दात दूतावासाने भारताचे आभार मानले आहेत.

१,३०० ठार; ७,००० जखमी

जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी म्हटल्याप्रमाणे, संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये १,३०० हून अधिक लोक मारले गेले असून ७,००० हून अधिक जखमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील १८ आरोग्य सुविधांवर हल्ला झाल्याचे सांगताना ०८ वैद्यकीय कर्मचारी मरण पावल्याचे म्हटले आहे. पण, विविध समस्यांचा सामना करत इराणमधील वैद्यकीय सुविधा सुरु असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

१९ दिवसांपासून संघर्ष 

गेल्या १९ दिवसांपासून मध्यपूर्वेत संघर्ष सुरु आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर अद्याप हल्ले सुरुच आहेत. हा संघर्ष थांबण्याचे अजून काही संकेत समोर आलेले नाहीत. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, सर्वोच्च सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि जनरल सोलेमनी यांचा मृत्यू झाला आहे. नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी देखील हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा केला जातो.