पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर सडकून टीका; संसदेचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सहकार्याचे आवाहन

गेल्या सहा दशकांत आम्ही जे करू शकलो नाही, ते रालोआ सरकार एवढय़ा कमी कालावधीत करू शकले, असा प्रश्न विरोधी पक्षाच्या नेत्यांना सतावत आहे.. खरे तर विरोधी पक्षातही फर्डे वक्तृत्व व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले सदस्य आहेत, परंतु त्यांना मुद्दामच संसदेत बोलू दिले जात नाही.. त्यांनी तोंड उघडले तर आपले महत्त्व कमी होईल.. एकूणच विरोधी पक्षाच्या नेत्यांना न्यूनगंडाने पछाडले आहे.. ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा निवडणुकीत दिल्या जातात, परंतु गेल्या साठ वर्षांत गरिबी घट्ट मूळ धरून बसली आहे, याचे श्रेय विरोधकांच्या राजवटीलाच जाते.. या व अशा एकापाठोपाठ एक वाग्बाणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत काँग्रेसला लक्ष्य करत अक्षरश: घायाळ केले. काळ्या पैशाच्या मुद्दय़ावरून सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाही मोदी यांनी अनुल्लेखाने चिमटे काढले. आपल्या वाग्बणांनी विरोधकांना नामोहरम करत असतानाच देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन करण्यासही मोदी विसरले नाहीत.

जवाहरलाल नेहरूविद्यापीठातील वाद, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, पठाणकोट हल्ला या मुद्दय़ांवर गेल्या काही दिवसांपासून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांच्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्याच्या निमित्ताने पंतप्रधान काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आपल्या सव्वा तासाच्या भाषणादरम्यान मोदी यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसलाच लक्ष्य केले. काँग्रेसला उपरोधिक टोले हाणताना, चिमटे काढताना मोदींनी मात्र संसदेचे अधिवेशन सुरळीत सुरू राहावे यासाठी विरोधकांनाच सहकार्याचे आवाहन केले. देशाच्या विकासासाठी नोकरशाही नव्हे तर सरकार व विरोधक मजबूत हवेत. तरच सरकारी अधिकाऱ्यांना राजकारण्यांचा वचक राहील. त्यांना आदरयुक्त धाक वाटेल, असे वातावरण राजकीय पक्षांनी निर्माण केले पाहिजे. त्यासाठी सरकार व विरोधकांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

संसदेतील प्रत्येक खासदाराला आपणच पंतप्रधान आहोत, असा विश्वास वाटायला हवा व तसे वातावरण संसदेत असले पाहिजे, असे सांगत संसदेचे कामकाज विनाअडथळा पार पडण्यासाठी पंतप्रधानांनी काही उपायही सुचवले. संसदेत प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना अधिवेशनादरम्यान आठवडय़ातील एक दिवस बोलण्याची संधी दिली जावी, त्यांचे मुद्दे मांडण्याची मुभा दिली जावी, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राहुलना चिमटे आणि टोले

  • कुछ लोगोंकी उमर तो बढती हैं लेकिन समझ नहीं बढती
  • संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग परदेश दौऱ्यावर असताना संसदेने पारित केलेल्या विधेयकाची प्रत भर पत्रकार परिषदेत टराटरा फाडणाऱ्यांनी सरकारला उपदेशाचे डोस पाजू नये
  •  काही लोकांना फक्त प्रश्न विचारता येतात. त्यांना कोणी प्रश्न विचारू नये, असाच त्यांचा तोरा असतो.नये, असा टोला मोदी यांनी हाणला.

मोदी म्हणाले..

  • गरिबी नसती तर मनरेगाची काही गरजच नव्हती.
  • मेक इन इंडियाची खिल्ली उडवली जाते. हा प्रकल्प देशासाठी आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या सरकारच्या निदर्शनास आणून द्या.
  • आंतरराष्ट्रीय महिलादिनी फक्त महिलांनाच संसदेत बोलू दिले जावे.
  • जीएसटी विधेयक काँग्रेसनेच आणले आहे. आतात्यांच्याकडूनच विरोध होतो आहे.
  • सर्व महत्त्वाच्या विधेयकांना विरोधकांनी विरोध करू नये, असे मी आवाहन करतो.

मतभिन्नतेला थारा देत नाही, या आरोपाला उत्तर देताना मोदी यांनी निकिता क्रुश्चेव्ह यांची गोष्ट सांगितले. स्टालिन जिवंत असताना क्रुश्चेव्ह यांनी त्यांच्यावर कधीच टीका केली नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ते स्टालिनवर तुफान टीका करू लागले. त्यांना एका तरुणाने याविषयी त्यांना छेडले असता, त्यांनी त्या तरुणाला सांगितले की असे प्रतिप्रश्न विचारण्याची हिंमत मी करू शकत नव्हतो. तू करू शकलास, हाच बदल आहे, असे उत्तर क्रुश्चेव्ह यांनी दिले. ही गोष्ट काही लोकांना समजायला वेळ लागेल. बदाम खाऊनही काही उपयोग होणार नाही. काही लोकांना ही बाब समजेल मात्र काही लोकांविषयी मी खात्री देऊ शकत नाही, असे सांगत मोदी यांनी राहुल यांना चिमटा काढला.

मोदी यांचे भाषण सुरू असताना राहुल गांधी त्यांच्या आसनावरून उठून संसदेबाहेर जाऊ लागले. मात्र, नंतर पुन्हा ते आसनावर येऊन बसले व पुन्हा उठले. सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला असता मोदी यांनी त्यांना रोखले.