IMD Below Normal Rainfall Prediction: भारतात येत्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) भारतातील पर्जन्यमान सरासरीच्या ९२ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, २०२६ मध्ये देशात तीन वर्षांत प्रथमच सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तीन वर्षांत प्रथमच सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान
रॉयटर्सच्या अहवालानुसार, २०२६ मध्ये भारतात गेल्या तीन वर्षांत प्रथमच सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने देशातील शेतकऱ्यांसह संबंधित क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू असल्याने अगोदर महागाई, इंधन तुटवडा यांचे संकट समोर असताना पर्जन्यमान कमी झाल्यामुळे नवी आव्हाने उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरासरी ९२ टक्के पाऊस
भारतात साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळ या राज्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत तो परतीचा प्रवासला सुरुवात करतो. यावर्षी मान्सून यापूर्वी नोंदवलेल्या सरासरीच्या ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. “सध्या कमकुवत ला नीनासारखी परिस्थिती सामान्य स्थितीत बदलत आहे. पण जूननंतर एल निनो विकसित होण्याची दाट शक्यता आहे,” असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले.
पावसाचे महत्व
मान्सून हा भारताच्या सुमारे ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीसाठी लागणारे पाणी, भूजल साठे व जलाशय भरणे या गरजा ७० टक्के पावसावर अवलंबून आहेत. भारतात जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांसाठी मान्सूनचा कालावधी गणला जातो. भारतीय हवामान विभागाच्या व्याख्येनुसार, चार महिन्यांच्या हंगामासाठी ८७ सेमी (३५ इंच) या ५० वर्षांच्या सरासरीच्या नोंदीनुसार ९६ ते १०४ टक्के पर्जन्यमानाला सामान्य म्हणून गणले जाते.
