आण्विक पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या प्रवेशाला चीनचा असणारा विरोध कशाप्रकारे योग्य होता, यासाठी चीनमधील प्रसारमाध्यमे पुढे सरसावताना दिसत आहेत. चीनमधील ‘ग्लोबल टाईम्स’ या इंग्रजी दैनिकाने मंगळवारी यासंदर्भात भूमिका मांडताना भारतातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. या वृत्तपत्रामधील अग्रलेखात भारताचा उल्लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलंकित आणि एखादा मुद्दा विनाकारण प्रतिष्ठेचा बनवणारा देश असा करण्यात आला आहे. भारताने एनएसजी गटात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या एनपीटी म्हणजे अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे भारताला या गटात प्रवेश मिळाला नाही, असे सांगत चीनने भारताच्या प्रयत्नात अडथळा आणल्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे.
भारतीय राष्ट्रवाद्यांनी योग्यप्रकारे वागायला शिकले पाहिजे. या राष्ट्रवाद्यांच्या चीनविषयीच्या प्रतिक्रियांमुळेच भारताचा एनएसजी प्रवेश रखडला. काही भारतीय खूपच आत्मकेंद्री आणि ढोंगी आहेत. याउलट भारतीय सरकार मात्र सभ्यतेने वागणारे आणि संवाद साधण्यावर भर देणार असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. इंग्रजी आणि चीनी भाषेत प्रसिद्ध होणारे ‘ग्लोबल टाईम्स’ हे वृत्तपत्र डाव्या विचारसरणीकडे झुकणारे मानले जाते. याशिवाय, हे वृत्तपत्र चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे विचारांचे पुरस्कर्ते मानले जाते.