नवी दिल्ली : दहशतवाद, अधिकारवाद आणि आर्थिक जुलूम या विरोधात भारत ‘जी- ७’ राष्ट्रांचा एक नैसर्गिक सहकारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘जी- ७’  देशांच्या बैठकीतील ‘ओपन सोसायटीज अ‍ॅण्ड ओपन इकॉनॉमिज’ या सत्रात मोदी दूरसंवाद माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी भारताची बांधिलकी असल्याचे अधोरेखित केले. तत्पूर्वी करोना साथीचा जागतिक मुकाबला करण्यासाठी लशींच्या पेटंटवरील संरक्षण उठवावे, त्याचबरोबर ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ हा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन मोदी यांनी केले. रोगांच्या आगामी साथी टाळण्यासाठी जागतिक समुदाय, नेते यांनी एकजूट दाखवण्याची गरज प्रतिपादन करताना मोदी म्हणाले, ‘‘एक वसुंधरा, एक आरोग्य ही संकल्पना जागतिक पातळीवर पुढे नेली पाहिजे.’’ त्यांच्या या संकल्पनेला जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.