प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी देशातील विरोधी पक्षाबद्दल मोठं विधान केलं आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्ष खूपच कमकुवत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ‘मला असं वाटतं की, निरोगी लोकशाहीसाठी भारतात एक मजबूत विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. जो पक्ष रचनात्मकही असायला हवा,’ असंही त्यांनी म्हटलं.
“भारताला मजबूत आणि रचनात्मक विरोधी पक्षाची गरज आहे. सध्याचा विरोधी पक्ष खूपच कमकुवत आहे. विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव असेल तर कोणतीही लोकशाही ‘लोकशाही’ असल्याप्रमाणे दिसत नाही,” असं मत आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक रविशंकर यांनी मांडलं आहे. ते पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.




“लोकशाहीला सशक्त विरोधी पक्षाची गरज असते. पण भारतात सध्या पुराणमतवादी किंवा सर्जनशील असा विरोधी पक्ष दिसत नाही. पण कोणताही राजकीय पक्ष भारतातील संस्थांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हे पश्चिम बंगालने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांतून हे दाखवून दिलं आहे. देशातील न्यायव्यवस्था देखील खूप सक्षम आहे. पण राष्ट्रीय स्तरावर देशात मजबूत विरोधी पक्ष नाही. यामुळे कोणताही मजबूत नेता देशाला हुकूमशहा असल्यासारखं वाटेल, पण तसं नाही. आपण एवढी मोठी लोकशाही आहोत. लोकांकडे सत्ता आहे,” असंही रविशंकर म्हणाले.
खरंतर, भारतीय अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे दोन महिन्यांसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. ते अमेरिकेतील विविध शहरांमध्ये प्रवास करत आहेत. कोविड नंतरच्या जगात शांतता किती महत्त्वाची आहे, याबाबतचा संदेश ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहेत. भारत ही एक व्हायब्रंट लोकशाही आहे आणि देशात होणार्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर एक मजबूत विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे, जो सध्या दिसत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. रविशंकर यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षातील एका गटाची भेट घेतली. ज्यामध्ये त्यांनी मानसिक आरोग्यावर चर्चा केली.