India Nepal Border Dispute Balen Shah Parliament Statement: भारत आणि नेपाळ दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावादावर नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह ऊर्फ ‘बालेन शाह’ यांनी संसदेत एक खळबळजनक विधान केले आहे. “केवळ भारतानेच नाही, तर नेपाळनेही अनेक ठिकाणी भारतीय भूभागावर अतिक्रमण केले आहे,” असे वक्तव्य पंतप्रधान शाह यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे नेपाळच्या संसदेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला असून, देशांतर्गत राजकारणात बालेन शाह यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. या विधानामुळे लिपुलेख आणि कालापाणी सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चालू वर्षाच्या सुरुवातीलाच नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर, ३५ वर्षीय बालेन शाह हे पहिल्यांदाच संसदेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांमधील कटुता मान्य करत, हा वाद इतिहासकार, भूमापक आणि तज्ज्ञांच्या मदतीने सामोपचाराने सोडवला पाहिजे, अशी भूमिका मांडली.

पंतप्रधान बालेन शाह संसदेत नेमकं काय म्हणाले ?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी खासदारांना संबोधित करताना सांगितले की, “मी पंतप्रधान झाल्यानंतर मला नुकतीच एक अशी माहिती मिळाली, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. भारताने केवळ नेपाळच्या जमिनीवरच अतिक्रमण केलेले नाही, तर नेपाळनेही अनेक ठिकाणी भारताची जमीन बळकावली आहे. आता दोन्ही देशांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून मित्राप्रमाणे एकत्र बसावे आणि हा वाद कायमचा मिटवावा.” इतकेच नव्हे तर, काठमांडूने या संदर्भात केवळ भारतच नव्हे, तर चीन आणि थेट ब्रिटन सरकारशीही संपर्क साधल्याचे शाह यांनी सांगितले. ब्रिटिशांच्या काळातील करारांमुळे हा वाद निर्माण झाल्याने त्यांनी ब्रिटनचा उल्लेख केला.

देशांतर्गत तीव्र विरोध; विरोधकांकडून माफीची मागणी

बालेन शाह यांच्या या विधानानंतर नेपाळच्या संसदेत एकच गदारोळ उडाला. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला असून हे विधान संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

  • नेपाली काँग्रेसच्या नेत्या बसना थापा आणि नेपाली कम्युनिस्ट पार्टीचे रमेश मल्ला यांनी पंतप्रधानांनी या विधानाचे पुरावे द्यावेत किंवा आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी केली.
  • नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली यांनीही या प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी, असे म्हटले आहे.
  • नेपाळचे प्रसिद्ध सीमातज्ज्ञ आणि भूगोलशास्त्रज्ञ बुद्धी नारायण श्रेष्ठ यांनी पंतप्रधानांचा दावा फेटाळून लावला. “नेपाळने कधीही भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. काही सीमावर्ती भागात दोन्ही बाजूंचे शेतकरी शेतीसाठी एकमेकांच्या जमिनीचा वापर करतात, कारण तिथले सीमास्तंभ गायब आहेत,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

परराष्ट्र मंत्रालयाकडून सारवासारव

पंतप्रधानांच्या विधानामुळे देशात वाद निर्माण झाल्यानंतर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला तातडीने स्पष्टीकरण द्यावे लागले. मंत्रालयाने म्हटले आहे की, “पंतप्रधानांचा रोख हा नो-मॅन्स लँड आणि सीमावर्ती भागातील नागरिकांकडून होणाऱ्या जमिनीच्या परस्पर वापराकडे होता.” दोन्ही देशांचे तांत्रिक पथक सध्या सीमास्तंभांची दुरुस्ती आणि ‘दशगजा’ (दोन्ही देशांमधील सामायिक पट्टी) भागातील माहिती गोळा करण्याचे काम करत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

माजी राजदूतांनीही बालेन शाह यांना सुनावले

भारतातील नेपाळचे माजी राजदूत निलांबर आचार्य यांनी सांगितले की, पंतप्रधान शाह यांना सीमावादाची पुरेशी माहिती नाही. दोन्ही देशांमधील ९७ टक्के सीमावाद आधीच सुटला आहे. नेपाळने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची कोणतीही अधिकृत नोंद नाही. दुसरे माजी राजदूत दीप कुमार उपाध्याय यांनीही याला दुजोरा दिला. “भारतानेही कधी अधिकृतपणे नेपाळवर जमीन बळकावल्याचा आरोप केलेला नाही. पंतप्रधानांनी हे विधान कोणत्या संदर्भात केले, हे अनाकलनीय आहे,” असे ते म्हणाले.

कैलास मानसरोवर यात्रेवरून आधीच वाद

काही आठवड्यांपूर्वीच भारताने लिपुलेख खिंडीतून सुरू केलेल्या ‘कैलास मानसरोवर यात्रेच्या’ नवीन मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला होता. १८१६ च्या सुगौली कराराचा हवाला देत लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हे नेपाळचेच अविभाज्य भाग असल्याचा दावा नेपाळने केला होता. मात्र, भारताने नेपाळचा हा दावा फेटाळून लावला असून, हा नेपाळचा एकतर्फी आणि कृत्रिम विस्तार असल्याचा टोला लगावला होता.

काय आहे हा सीमावाद?

भारत, नेपाळ आणि चीन (तिबेट) यांच्या त्रिकोणावर लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापाणी हे भाग आहेत. भारत या भागाला उत्तराखंडचा हिस्सा मानतो. २०२१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने नेपाळचा नवीन राजकीय नकाशा जारी करून हे तिन्ही प्रदेश आपल्या नकाशात दाखवले होते, ज्याला भारताने तीव्र विरोध केला होता.

ब्रिटनने मध्यस्थी करावी; बालेन शाह यांचा नवा पवित्रा

गायक आणि रॅपर ते काठमांडूचे महापौर आणि आता थेट नेपाळचे पंतप्रधान बनलेल्या बालेन शाह यांनी आता या वादात ब्रिटनला ओढल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, बालेन शाह म्हणाले, “आम्ही भारत आणि चीन व्यतिरिक्त ब्रिटन सरकारशीही बोललो आहोत. आमचे स्पष्ट मत आहे की, ब्रिटननेही यात रस दाखवावा, कारण जेव्हा ब्रिटिश भारतामधून गेले, तेव्हापासूनच हा सीमावाद प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणात ब्रिटनने मध्यस्थी करणे गरजेचे आहे.”