India New Zealand Free Trade Agreement : भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार करण्यात आल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. या मुक्त व्यापार करारासाठी मार्चपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. त्यानंतर कराराच्या वाटाघाटीवर सोमवारी स्वाक्षरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेनंतर हा करार जाहीर करण्यात आला. मात्र, कराराच्या दुसऱ्याच दिवशी भारताला धक्का बसला आहे. कारण या मुक्त व्यापार कराराला न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी विरोध दर्शवला आहे.

न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी या व्यापार कराराला विरोध करत न्यूझीलंडसाठी हा करार वाईट असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी एक्सवर आपली भूमिका मांडत भारताबरोबर झालेल्या या व्यापार कराराला दुर्दैवाने विरोध करत असल्याचं म्हटलं आहे.

विन्स्टन पीटर्स यांनी काय म्हटलं?

पीटर्स यांनी म्हटलं की, “न्यूझीलंड फर्स्ट, आज जाहीर झालेल्या भारत मुक्त व्यापार कराराला दुर्दैवाने विरोध करत आहे. आम्ही भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराला मुक्त किंवा निष्पक्ष मानत नाही. दुर्दैवाने न्यूझीलंडसाठी हा एक वाईट करार आहे. हा करार भारताला खूप काही देतो. मात्र, न्यूझीलंडला त्या बदल्यात पुरेसं काही मिळत नाही. न्यूझीलंडच्या शेतकऱ्यांसाठी हा करार चांगला नाही आणि आमच्या ग्रामीण समुदायांना त्याचं समर्थन करणं अशक्य आहे”, असं विन्स्टन पीटर्स यांनी म्हटलं.

न्यूझीलंड ८२ टक्के भारतीय वस्तूंवरील टॅरिफ हटवणार, नेमकं काय करार झाला?

भारत आणि न्यूझीलंडने मार्चपासून सुरू असलेल्या वाटाघाटीनंतर सोमवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि नवोपक्रम (इनोव्हेशन) अशा विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.

कराराच्या घोषणेनंतर मोदींनी काय म्हटलं?

भारत आणि न्यूझीलंडमधील या कराराचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “भारत-न्यूझीलंड संबंधांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल. ऐतिहासिक भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर माझे मित्र पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी काही वेळापूर्वी माझी खूप चांगली चर्चा झाली. केवळ नऊ महिन्यांत पूर्ण झालेला हा ऐतिहासिक करार आपल्या दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा दर्शवतो.”

न्यूझीलंड भारतात गुंतवणार २० अब्ज डॉलर्स

“भारत-न्यूझीलंड भागीदारी नवीन उंची गाठणार आहे. मुक्त व्यापार करारामुळे पुढील ५ वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यूझीलंडकडून भारतात विविध क्षेत्रांमध्ये २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. याचबरोबर आम्ही क्रीडा, शिक्षण आणि सांस्कृतिक संबंधांसारख्या इतर क्षेत्रांमध्येही सहकार्य अधिक दृढ करत आहोत”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

दोन्ही देश करणार टॅरिफ कपात

या मुक्त व्यापार करारामुळे न्यूझीलंडहून भारतात निर्यात होणाऱ्या ९५ टक्के वस्तूंवरील टॅरिफ कमी होणार किंवा हटवले जाणार आहे. दुसरीकडे, भारतातून न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या ५७ टक्के वस्तू सुरुवातीला टॅरिफ शुल्कमुक्त राहतील आणि करार पूर्णपणे लागू झाल्यावर हे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत वाढेल, तर उरलेल्या १३ टक्के वस्तूंवरील टॅरिफमध्येही मोठी कपात होईल.