S. Jaishankar slams Pakistan over Iran : अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धात भारताने मध्यस्थी करावी असा सूर उमटलेला असताना देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोठं विधान केलं आहे. भारत स्वतःला पाकिस्तानप्रमाणे दलाल मानत नाही, असं एस. जयशंकर यांनी म्हटलं असल्याचं वृत्त पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. मध्यपूर्व देशांतील वाढत्या संघर्षावर चर्चा करण्याकरता आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान आणि तुर्कीसह अनेक देश वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्याचे प्रयत्न करत आहेत.
पीटीआयच्या सूत्रांनुसार, जयशंकर यांनी बैठकीत म्हटले की, “या प्रकरणातील पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांत काहीही नवीन नाही, कारण १९८१ पासून अमेरिकेने त्या देशाचा वापर केला आहे.आम्ही दलाल राष्ट्र नाही”, असं त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत एस. जयशंकर म्हणाले.

पश्चिम आशियातील संघर्ष थांबवा
सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले आहे की, पश्चिम आशियातील संघर्ष त्वरित संपवला पाहिजे, कारण याचा परिणाम संबंधित सर्वच देशांवर होत आहे.” भारताने तणाव कमी करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
पश्चिम देशातील संघर्षावर भारत गप्प आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. मात्र, हे आरोप सरकारने फेटाळून लावले. “आम्ही भाष्य करत आहोत आणि प्रतिसादही देत आहोत,” असे सरकारने ठामपणे सांगितले. पीटीआय सूत्रांनुसार, सरकारने यावर भर दिला की, आखाती देशांमधील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि देशांतर्गत ऊर्जा सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बदलत्या परिस्थितीतही ही दोन्ही उद्दिष्टे प्रभावीपणे हाताळली गेली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
