भारत आणि नॉर्डिक देशांनी त्यांच्यातील संबंध ‘हरित तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती सामरिक भागीदारी’ स्तरावर नेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. स्वच्छ आणि हरित ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक क्षेत्रात या देशांबरोबर अधिक सहकार्य केले जाईल. नॉर्डिक देशांमध्ये नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, आइसलँड, फिनलँड या देशांचा समावेश होतो. यानंतर पंतप्रधान दोन दिवसांच्या दौर्यासाठी इटलीला रवाना झाले.

भारत-नॉर्डिक देशांच्या तिसर्या शिखर परिषदेनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त परिपत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्डिक देशांशी एकत्र काम करीत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकशाही, कायद्याचे राज्य, विविधता यांमुळे आम्ही नैसर्गिक भागीदार असल्याचे मोदी म्हणाले. या परिषदेला नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, स्वीडनचे प्रमुख उपस्थित होते. हरित तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगाच्या चांगल्या भविष्याची हमी आपण देऊ, असे मोदी म्हणाले. आजच्या कठीण काळात भारत आणि नॉर्डिक देश एकत्र काम करणे सुरू ठेवतील, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, तिसर्या भारत-नॉर्डिक शिखर परिषेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आइसलँड, फिनलँड आणि डेन्मार्कच्या प्रमुखांच्या स्वतंत्र भेटी घेतल्या आणि द्विस्तरावरील संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. ऊर्जा, व्यापार, डिजिटल क्षेत्र यामधील सहकार्याबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली. आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टुन फ्रॉस्टाडोटिर, फिनलँडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची त्यांनी भेट घेतली. सामाजिक माध्यमावर टिप्पणी करून त्यांनी ही माहिती दिली.