पीटीआय, ओस्लो
भारतामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणार्या नॉर्वेच्या पत्रकाराच्या खोचक प्रश्नाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी चोख प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यात अशा प्रकारचा प्रश्न दुसर्यांदा विचारण्यात आला होता. राज्यघटनेतील मूलभूत हक्क, भारताचे जागतिक योगदान आदी दाखले परराष्ट्र सचिवांनी आपल्या उत्तरात दिले आहेत.
नॉर्वेच्या पत्रकार हेले लेंग स्वेन्सेन यांनी ‘भारतामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप होत असताना भारतावर विश्वास का ठेवावा,’ असा खोचक प्रश्न विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनस स्टोर यांच्या माध्यमांसमोरील संयुक्त निवेदनावेळीही माध्यमांनी प्रश्न विचारू नयेत, असे सांगण्यात आले असतानाही त्यांनी हा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताच्या नॉर्वेमधील दूतावासाने सोमवारी रात्री पत्रकार (पान ९ वर) (पान १ वरून) परिषदेचे आयोजन केले. तेथे स्वेन्सेन यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिमेकडील देशांसाठीचे सचिव सिबी जॉर्ज यांनी त्याला सविस्तर उत्तर दिले.
भारताने यशस्वीरीत्या आयोजित केलेल्या जी-२०, ‘एआय इम्पॅक्ट’, ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ’ अशा शिखर परिषदांचा दाखला जॉर्ज यांनी दिला. तसेच, करोना काळात भारताने १०० हून अधिक देशांना लसी पाठविल्याचे सांगितले. जागतिक स्तरावरील मोठ्या आव्हानांचा सामना करताना भारताचे जे योगदान आहे, त्यामुळे जगभरात भारताबद्दल विश्वासाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले. जागतिक स्तरावर भारत विश्वासार्ह देश का आहे, याचा लेखाजोखाच त्यांनी दिला. ते म्हणाले, ‘भारत एक उत्तम सभ्यता असलेला देश आहे. जगाला नेहमीच भारताने अद्वितीय असे काही दिले आहे आणि आजही भारताचे जागतिक पातळीवर त्या दृष्टीने योगदान आहे. भारताची राज्यघटना सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाची हमी देते. न्याय, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म-उपासनास्वातंत्र्य यांचीही हमी देते. तसेच, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांतून समान संधी उपलब्ध करून देते. जगामध्ये भारताची लोकसंख्या एक षष्टमांश आहे. मात्र, जागतिक समस्यांना भारत एक षष्ठमांशदेखील कारणीभूत नाही. ’
‘आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार?’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न टाळल्यानंतर हेले लेंग स्वेन्सेन यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिमेकडील देशांसाठीचे सचिव सिबी जॉर्ज यांना थेट सवाल केले. ‘‘द्विपक्षीय संबंध सुधारत असताना, मानवी हक्कांची पायमल्ली पायमल्ली रोखण्याचे आश्वासन तुम्ही देणार काय, भविष्यात भारतीय पत्रकारांच्या कळीच्या प्रश्नाला उत्तरे देणे पंतप्रधान सुरु करतील काय,’’ असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यावर जॉर्ज यांनी त्यांना थांबवत ठराविक पद्धतीने प्रश्न विचारू नका असे सुनावले.
फारशा माहीत नसलेल्या स्वयंसेवी संस्थांचे ते अहवाल वाचतात आणि प्रश्न विचारतात. शतकानुशतके आमच्या येथे लोकशाही व्यवस्था आहे. – सिबी जॉर्ज, परराष्ट्र सचिव
