सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना भारत काहीच प्रतिसाद देत नसल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पाकिस्तानच्या शांतता प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात कमी पडले आहेत. मात्र, शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या इच्छेला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. भारत आणि अफगाणिस्तानने चांगल्या शेजाऱ्यांप्रमाणे पुढे येऊन पाकिस्तानच्या शांती प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. जेणेकरून एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र संपुष्टात येईल, असे आसिफ यांनी सांगितले.

भारत सीमाभागात सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याबद्दल आसिफ यांनी चिंता व्यक्त केली. भारताकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. या दरम्यान करण्यात येणाऱ्या गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यात सीमेवरील लोकांना लक्ष्य करण्यात येते. तसेच पाकिस्तानमध्ये आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी भारताकडून अफगाणिस्तानच्या कट कारस्थानांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप आसिफ यांनी केला. सिंधू पाणी कराराच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानला मिळालेल्या पाठिंब्यानंतर हा मुद्दा जागतिक बँकेसमोर मांडता आला. त्यामुळे आता भारताने पाकिस्तानच्या शांती प्रयत्नांना प्रतिसाद द्यावा. तसेच स्वत:च्या सीमांचे रक्षण करण्याचे पुरेपूर सामर्थ्य पाकिस्तानकडे असल्याचा दावाही ख्वाजा आसिफ यांनी केला.

आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असून भारतीय जवानांमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले जात असल्याचे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले होते. ‘नियंत्रण रेषेच्या संरक्षणासाठी भारतीय जवान तैनात आहेत. पश्चिम सीमेवर भारतीय सैन्याचे पूर्णपणे वर्चस्व आहे. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच जम्मू काश्मीरसह पंजाबमध्ये होणारी घुसखोरी पूर्णपणे रोखण्यातही जवानांना यश आले आहे. मात्र तरीही पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत,’ अशी माहिती जेटली यांनी सभागृहाला दिली होती.