India Nuclear Weapons News Report 2026: भारताच्या अण्वस्त्र साठ्यात सातत्याने वाढ होत असून सध्या भारताकडे सुमारे १९० अण्वस्त्रे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा साठा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानपेक्षा २० ने अधिक असून, भारत लवकरच ब्रिटनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्था ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’ने (एफएएस) आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘एफएएस न्यूक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट’चे संचालक हॅन्स क्रिस्टेनसेन यांनी ‘भारताची अण्वस्त्रे – २०२६’ या शीर्षकाखाली हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारताकडे सध्या अण्वस्त्र डागण्याची क्षमता असणाऱ्या नऊ वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत आहेत. यामध्ये दोन प्रकारची लढाऊ विमाने, जमिनीवरून मारा करणारी सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि समुद्रातून मारा करणाऱ्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश आहे. याशिवाय, आणखी किमान दोन प्रगत यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही वर्षांत त्या तीनही सैन्यदलांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

७३० किलो प्लुटोनियम उपलब्ध

भारताकडे सध्या प्रत्यक्ष तैनातीसाठी १६० हून अधिक अण्वस्त्रे सज्ज आहेत, तर नव्याने तयार होणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी अतिरिक्त अस्त्रे जोडली गेल्यास हा एकूण साठा १९० पर्यंत पोहोचतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. इंटरनॅशनल पॅनेल ऑन फिसाइल मटेरियल्स २०२६ च्या आकडेवारीचा हवाला देत, भारताने सुमारे ७३० किलोग्रॅम वेपन-ग्रेड प्लुटोनियम तयार केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका अण्वस्त्रासाठी साधारणपणे ४ किलोग्रॅम प्लुटोनियम लागते, हे गृहीत धरल्यास भारताकडे उपलब्ध साठ्यातून १४० ते २२५ अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट होते.

भारताचे ‘नो फर्स्ट युझ’ धोरण कायम

भारताने सुरुवातीपासूनच ‘प्रथम अण्वस्त्र वापर न करण्याचे’ (नो फर्स्ट युझ – NFU) धोरण अवलंबले आहे. त्यामुळे शत्रूवर आधी हल्ला करण्याऐवजी, प्रत्युत्तरादाखल कठोर मारा करण्यावर भारताचा भर राहिला आहे. भारताची सागरी अण्वस्त्र क्षमता अधिक भक्कम आणि सुरक्षित होत असल्याने जमिनीवरील यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानचे धोरण काय?

दुसरीकडे पाकिस्तानने मात्र ‘नो फर्स्ट युज’ धोरण कधीही मान्य केलेले नाही. भारताच्या पारंपरिक लष्करी वर्चस्वाला शह देण्यासाठी पाकिस्तानने ‘पहिल्या वापराचा’ पर्याय खुला ठेवला आहे. आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास किंवा पारंपरिक सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्यास अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशारा पाकिस्तानकडून सातत्याने दिला जातो.

जागतिक अण्वस्त्र स्थिती

जगाचा विचार करायचा झाल्यास रशिया आणि अमेरिका अव्वल स्थानी आहेत. जगात सर्वाधिक ५,४२० अण्वस्त्रे रशियाकडे असून अमेरिकेकडे ५,०४२ अस्त्रे आहेत. या दोन देशांकडेच जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी तब्बल ८६ टक्के साठा आहे.

चीनचाही वेगाने विस्तार होत असून त्यांच्याकडे सुमारे ६२० अण्वस्त्रे असून तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. चीन अत्यंत वेगाने आपला अण्वस्त्र साठा वाढवत आहे.

याचप्रमाणे फ्रान्सकडे ३७०, ब्रिटनकडे २२५, तर दक्षिण आशियात भारताकडे १९० आणि पाकिस्तानकडे सुमारे १७० अण्वस्त्रे आहेत. याशिवाय इस्रायलकडे ९० आणि उत्तर कोरियाकडे ६० अण्वस्त्रे असल्याचा अंदाज या अहवालात नोंदवण्यात आला आहे.