India tribute to Ayatollah Ali Khamenei death: अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराण विरोधात युद्ध पुकारले. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्य झाला. यानंतर भारताने आज त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सरकारच्या वतीने नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी खामेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या पुस्तकावर स्वाक्षरी केली.

शनिवारी (२८ फेब्रुवारी) अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह त्यांचे काही कुटुंबिय आणि इराणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या झाली. यानंतर इराणने त्यांना शहीद दर्जा देत ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला, तसेच सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या दिल्या.

आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील लष्करी संघर्षाचा उल्लेख केला होता. “लष्करी संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाही”, असे विधान मोदी यांनी केले होते. त्यानंतर काही वेळातच परराष्ट्र सचिवांनी इराणी दूतावासाला भेट दिली. खामेनी यांच्या हत्येनंतर इराण आणि आखाती प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी भारत सरकार संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर देत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाची आतापर्यंतची निवेदन

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आतापर्यंत दोन महत्त्वाची विधाने जारी केली आहेत. ज्या दिवशी हल्ला झाला त्याचदिवशी आणि इराण संघर्षाच्या चौथ्या दिवशी (३ मार्च) भारताने दोन वेळा आपली भूमिका मांडली होती. दुसऱ्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने संयम बाळगण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन पुन्हा केले होते. तसेच या संघर्षात काही भारतीय नागरिक मृत्यू पावले तर काही बेपत्ता झाल्याचे मान्य केले होते.

३ मार्च रोजी परराष्ट्र मंत्रालयाने आधीच्या विधानाचा संदर्भ देताना म्हटले की, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण आणि आखाती प्रदेशात संघर्ष सुरू झाला तेव्हा आम्ही तीव्र चिंता व्यक्त केली होती. भारताने दोन्ही बाजूच्या पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. तसेच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितले होते. दुर्दैवाने रमजानच्या पवित्र महिन्यात या प्रदेशातील परिस्थिती लक्षणीयरित्या आणि सतत बिघडत चालली आहे.

अयातुल्ला अली खामेनी कोण होते?

अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म १९३९ साली इराणच्या उत्तरेकडील मशहद शहरात झाला. ते आठ भावंडांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील एक धर्मगुरू होते आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत खामेनी यांनी धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान त्यांनी कोम येथे धार्मिक अध्ययन केले आणि १९६२ साली अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या शाहविरोधी चळवळीत ते सहभागी झाले.

शाहच्या राजवटीदरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर ते प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले. १९८१ ते १९८९ या काळात त्यांनी इराणचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आणि इराण-इराक युद्धाच्या काळात देशाचे नेतृत्व केले. १९८९ साली अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी यांनी सर्वोच्च नेतेपद स्वीकारले.