India Oil Stocks and Petroleum Reserve Government Update : मध्यपूर्वेतील (Middle East) बदलत्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असताना, भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत सध्या चिंतेचे कारण नसल्याचे समोर आले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. भारतात सध्या कच्च्या तेलाचा आणि शुद्ध इंधनाचा साठा सुमारे २५ दिवस पुरेल इतका आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

नव्या पर्यायांचा शोध सुरू

मध्यपूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेता, अधिकारी कच्च्या तेलासह एलपीजी (LPG) आणि एलएनजी (LNG) आयातीसाठी पर्यायी देशांच्या शोधात आहेत. तसंच, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचंही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

देशात किती तेल साठा आहे?

“भारताकडे २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) साठा आणि २५ दिवसांचा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. तर, भारताकडे एकूण ८ आठवड्यांचा कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आहे. भारताचे केवळ ४०% कच्चे तेल ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ (Strait of Hormuz) येते, तर उर्वरित ६०% कच्चे तेल इतर स्रोतांमधून येते. “भारत मागील करारांनुसार रशियन कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार आहे”, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) सोमवारी जाहीर केले की, जहाजांच्या वाहतुकीसाठी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, या महत्त्वाच्या जलमार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अमेरिका आणि इस्रायलने सोमवारी इराणविरुद्धच्या हवाई कारवाया अधिक तीव्र केल्या. इस्रायलने लेबनॉनमध्येही हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या टँकर्सना लक्ष्य केले. परिणामी, या अरुंद मार्गातून होणारी जहाजांची वाहतूक वाढत्या प्रमाणात धोकादायक बनली आहे. अनेक टँकर्स आणि मालवाहू जहाजे हा मार्ग टाळत आहेत. विमा कंपन्यांनी या भागात कार्यरत असलेल्या जहाजांचे विमा संरक्षण रद्द केले आहे, ज्यामुळे या प्रदेशातून जहाजांची ये-जा करणे अधिक कठीण झाले आहे.

Kpler चे मुख्य संशोधन विश्लेषक सुमित रितोलिया यांच्या मते, जर मध्य-पूर्वेकडील पुरवठा तात्पुरता पूर्णपणे थांबला, तर त्याचा तात्काळ परिणाम मालवाहतुकीवर (Logistical) आणि किमतींवर होईल. जर हा अडथळा दीर्घकाळ टिकला, तर पुरवठ्याचा धोका अधिक वाढेल.