USISPF Leadership Summit 2026 : जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी भारत हा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे, असे अमेरिकेचे आर्थिक विकास, ऊर्जा आणि पर्यावरणविषयक उपसचिव जेकब हेलबर्ग यांनी म्हटले आहे. चीनमधील इंजिनिअरिंग क्षेत्रातील मनुष्यबळ आणि त्यांच्या कौशल्याला तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता फक्त भारतातच आहे, अशा शब्दांत त्यांनी भारतीय तरुणांच्या कौशल्याचा गौरव केला.
२०२६ च्या ‘USISPF लीडरशिप समिट’मध्ये बोलताना हेलबर्ग यांनी भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे समर्थन केले. ते म्हणाले की, भारताकडे उपलब्ध असलेली इंजिनिअर्सची मोठी संख्या, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि भक्कम तंत्रज्ञान इको-सिस्टीम यांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि ‘डीप-टेक’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी दोन्ही देशांचे एकत्र येणे गरजेचे आहे.
‘डेव्हलपर इकोसिस्टम’वर भर
हेलबर्ग यांनी स्पष्ट केले की, भारताची मोठी लोकसंख्या, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि आर्थिक प्रगतीमुळे हा देश नवीन सेवा आणि तंत्रज्ञान तयार करण्यासाठी एक उत्तम केंद्र बनला आहे. यामुळेच अमेरिकेला भारतासोबत मिळून एक सामायिक ‘डेव्हलपर इकोसिस्टम’ तयार करायची आहे. ही सामायिक व्यवस्थाच दोन्ही देशांच्या भविष्यातील मजबूत संबंधांचा पाया ठरेल.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना हेलबर्ग म्हणाले की, भारत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. ‘एआय’ (AI) क्षेत्रात काम करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. तसेच, अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने नुकताच सुरू केलेला ‘ट्रस्टेड पार्टनर प्रोग्राम’ या भागीदारीला अधिक बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत-अमेरिका संबंधांना नवी गती
गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंध वेगाने सुधारत आहेत. याच पार्श्वभूमीवर जेकब हेलबर्ग यांनी भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. क्रिश्नन यांची भेट घेतली. या बैठकीत अमेरिकन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, तसेच येथेच नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावावा यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर हेलबर्ग यांनी सोशल मीडियावर सांगितले की, अमेरिका आणि भारत हे एकमेकांचे स्पर्धक नसून, एकमेकांना पूरक असणारे भागीदार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ‘AI इम्पॅक्ट समिट’मुळे या संबंधांना अधिक बळकटी मिळाली असून, दोन्ही देश आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्र इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
