Operation Sindhu Of India: इराण-इस्रायल संघर्षात अडकलेल्या नेपाळी आणि श्रीलंकन नागरिकांना, भारत ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून इराणमधून बाहेर काढण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी विनंती केल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून इस्रायलने इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केल्यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. याचाच भाग म्हणून इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य करत हल्ले केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलवर हल्ले केले आहेत. यामुळे या दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू सुरू केले होते.
“नेपाळ आणि श्रीलंका सरकारच्या विनंतीनुसार, इराणमधील भारतीय दूतावास सध्या तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढत आहे. याचबरोबर भारतीय दूतावास तेथील नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांनाही परत आणणार आहे,” असे इराणमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
याचबरोबर दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांक देखील जाहीर केले असून, नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांना टेलिग्रामद्वारे किंवा जाहीर केलेल्या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी खालील क्रमांक जाहीर केले आहेत: +९८९०१०१४४५५७, +९८९१२८१०९११५, आणि +९८९१२८१०९१०९.
ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून इराणच्या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांना गेल्या शनिवारी एक विशेष विमान सकाळी तुर्कमेनिस्तानमधील अश्गाबात येथून दिल्लीत दाखल झाले होते. याचबरोबर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी एका विशेष विमानातून २९० भारतीय विद्यार्थ्यी भारतात दाखल झाले आहेत. यातील बहुतेक विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरमधील होते. ते इराणमधील मशहाद शहरात होते.
दरम्यान इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. यामुळे या दोन्ही देशांमध्ये विद्यार्थी, यात्रेकरू, संशोधक आणि कामगारांसह लाखो भारतीय नागरिक अडकले आहेत. तेहरान आणि तेल अवीवमधील भारतीय दूतावास भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधत आहेत. यातील काही भारतीय नागरिक धार्मिक केंद्रांमध्ये, तर काही भारतीय विद्यार्थी विद्यापीठांमध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत आहेत.