पीटीआय, नवी दिल्ली

विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आघाडीतील मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने सोमवारी दिल्लीत एकजूट दाखवली. यावेळी मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

‘मतांची लूट’ आणि ‘निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप’ यासंदर्भात सरन्यायाधीशांना पत्र पाठविण्याचा निर्णय आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय नीट-सीबीएसई पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. नवी दिल्लीतील कॉ्स्टिटट्यूशन क्लबमध्ये पार पडलेल्या या बैठकीला २२ हून अधिक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर बर्‍याच कालावधीने झालेल्या या बैठकीत विरोधकांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवत सरकारला घेरण्याची तयारी दर्शवली आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि आर्थिक परिस्थितीबाबत केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशीही मागणी विरोधी पक्षांनी यावेळी केली आहे.

दर दोन महिन्यांनी बैठक

बैठकीत पुढील काळासाठी संघटनात्मक आराखडाही निश्चित करण्यात आला. त्यानुसार ‘इंडिया’ आघाडीची बैठक दर दोन महिन्यांनी घेण्यात येणार असून पुढील बैठक आठ ऑगस्टला हैदराबाद येथे होईल. पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधकांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी दररोज सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांची समन्वय बैठक घेण्याचेही ठरविण्यात आले.

जनतेच्या प्रश्नांवर एकजूट

लोकसभा निवडणुकीनंतर काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आघाडीतील एकजूट आणि भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी एकत्रितपणे भाजपविरोधी राजकीय रणनीती आखण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर संयुक्त भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली.

बैठकीला कोण उपस्थित?

बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सुप्रिया सुळे, डाव्या पक्षांचे नेते तसेच इतर अनेक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला. दरम्यान, द्रमुक आणि आम आदमी पक्ष या बैठकीला अनुपस्थित राहिले.

देशासमोरील संबंधित अनेक प्रश्नांवर सर्व विरोधी पक्ष एकमताने लढा देणार आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंका दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांचे लक्ष या विषयाकडे वेधले जाणार आहे. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस