भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेला सुरुवात व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून दूर करणे गरजेचे आहे, असे विधान काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केल्याचा आरोप होत असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अय्यर यांच्या विधानावर भाजप आणि राजदने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत आपले मत व्यक्त करावे आणि या प्रश्नावर त्यांची मते काय आहेत ते देशाला सांगावे, असे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, भाजपने केलेला आरोप निखालस खोटा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आपण अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नसल्याचे स्पष्टीकरण अय्यर यांनी पक्षाकडे दिले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा सुरू होण्यासाठी काय केले पाहिजे, असा सवाल वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अय्यर यांना विचारला असता ते म्हणाले की, सर्वप्रथम मोदी यांना पदावरून दूर करणे गरजेचे आहे, त्यानंतरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते, आपल्याला आणखी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.