India Pakistan Ceasefire : पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी आज दुपारी ३.३५ वाजता फोनवरून चर्चा केली. दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकवाक्यता झाली. याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या आहेत. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करतील, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.

जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता. दरम्यान दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या जम्मू काश्मीर येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. भारतातील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्याला भारतीय लष्कराने वेळोवेळी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान आज भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आणि दोन्ही देशांचे शस्त्रविरामाच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडे तीनच्या सुमारास पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दोन्ही अधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या शस्त्रविरामावर एकमत झाले. त्यानुसार संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबवण्यात आल्याचेही मिस्री यांनी सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये १२ मे म्हणजेच सोमवारी दुपारी १२ वाजता चर्चेची पुढची फेरी होणार आहे.

भारत पाकिस्तान यांच्यात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी?

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर सहमती झाल्याची पोस्ट ट्रूथ सोशलवर केली होती. “रात्रभर अमेरिकेच्या मध्यस्थीने सविस्तर चर्चा केल्यानंतर भारत व पाकिस्तानने पूर्णपणे व तातडीने शस्त्रविराम करण्यावर सहमती दर्शवल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यासाठी मी दोन्ही बाजूंचं अभिनंदन करतो”, असं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत पाकिस्तान यांच्यातल शस्त्रविरामाच्या मुद्द्यावर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रु रुबियो यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, “गेल्या ४८ तासात व्हीपी व्हान्स आणि मी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेहबाज शरिफ, परराष्ट्र मंत्री सुब्र्हमन्यम जयशंकर, चीफ आर्मी स्टाफ असिम मुनिर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि असिम मलिक याांचा समावेश होता. मला जाहीर करताना आनंद होतो आहे की भारत आणि पाकिस्तान सरकारने तात्काळ शस्त्रविरामावर सहमती दर्शवली आहे आणि एका तटस्थ ठिकाणी यासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.”