DGMO Meeting: भारत आणि पाकिस्तान दरम्यान सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या पातळीवर आज चर्चा होणार असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तैनात केलेले सैनिक, उपकरणे आणि उभी केलेली लष्करी व्यवस्था कमी करण्याची चर्चा यावेळी होईल, असे सांगितले जात आहे. दोन्ही देश सीमेवर सैन्याची स्थिती एप्रिलपूर्व पातळीवर नेण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पुढील चर्चा ही डीजीएमओ किंवा त्यांनी निर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये होणार आहे का? याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल कशीफ अब्दुल्ला यांच्याशी १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चर्चा केली होती. शनिवार नंतर झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत दोन्ही डीजीएमओंनी लष्करी कारवाई थांबविण्याचे मान्य केले होते. तसेच दोन्ही बाजूंनी सीमेवरील आणि चौक्यांवरील सैनिक कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.

लष्कराने दिलेल्या निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी गोळीबार होऊ नये किंवा एकमेकांविरोधात कोणतीही आक्रमक आणि शत्रुत्वाची कारवाई करू नये, ही वचनबद्धता कायम ठेवण्याचीही चर्चा यावेळी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ साली दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या शस्त्रविरामाचे पालन करण्यावरही डीजीएमओ पातळीवर चर्चा करण्यात आलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी हॉटलाईनवरून साधलेल्या संवादानुसार, २४ / २५ फेब्रुवारी २०२१ च्या मध्यरात्रीपासून नियंत्रण रेषेसह सीमेवरील सर्व भागात शस्त्रविरामाचे काटेकोर पालन करण्यास सहमती दर्शविण्यात आली होती. एलओसीवर अनेक काळापासून तणाव आणि शस्त्रसंधींचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली दोन्ही देशांच्या वतीने नव्याने करार करण्यात आला होता.