परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेबाबत सरताज अझीझ यांची माहिती
पठाणकोट येथील हल्ल्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असले तरी दोन्ही देशातील परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा ठरल्याप्रमाणे पंधरा जानेवारीला होईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने मात्र पठाणकोट हल्ल्याबाबत दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधितांवर त्वरित निर्णायक कारवाई केली तरच चर्चा होऊ शकते अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या चर्चेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
पाकिस्तानी संसदेत एका प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले की, १५ जानेवारीला ठरल्याप्रमाणे चर्चा होईल. र्सवकष द्विपक्षीय संवादासाठी विविध बैठकांचे नियोजन दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव करतील. अझीझ यांनी सांगितले की, काश्मीरच्या मुद्दय़ावर तर चर्चा होईलच, पण इतर प्रश्नांचाही त्यात समावेश आहे.
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पार्टीच्या शिरीन मझारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर अझीज यांनी सांगितले की, दोन्ही देशात ठरल्याप्रमाणे चर्चा होईल.
भारताचे मावळते दूत टीसीए राघवन यांनी असे सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीरवर दोन्ही देशात चर्चा होईल. त्या अनुषंगाने मझारी यांनी हा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, या चर्चेबाबत भूमिका घेताना पाकिस्तानशी चर्चा पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने दिलेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे पाकिस्तान तातडीने कुठली कारवाई करतो यावर सगळे काही अवलंबून आहे असे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारताने चर्चेच्या भवितव्याबाबत सगळी जबाबदारी पाकिस्तानवर टाकली आहे. दोन्ही देशात १५ जानेवारीला इस्लामाबाद येथे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर व त्यांचे समपदस्थ एझाज अहमद चौधरी यांच्यातील नियोजित चर्चेवर पठाणकोट हल्ल्याने अनिश्चिततेचे सावट आहे.
नवाझ शरीफ व नरेंद्र मोदी यांच्या लाहोरमधील भेटीनंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील भारतीय हवाई तळावर हल्ला केला होता.
चर्चा उधळून लावण्याचे प्रयत्न हाणून पाडू- आसिफ
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारी चर्चा उधळून लावण्याचे कोणत्याही दहशतवादी गटाचे मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी स्पष्ट केले आहे.दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या घटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे, असे आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितल्याचे पाकिस्तान नभोवाणीने म्हटले आहे.दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत, त्यामुळे प्रत्येक स्वरूपातील दहशतवादाचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.