India Pakistan Tension : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने आगळीक सुरु केली असून पाकिस्तान भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करत आहे. भारत देखील पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. यावेळी श्रीनगर विमानतळासह अनेक ठिकाणी सायरन आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती सांगितली जात आहे. काश्मीर खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागात शुक्रवारी रात्री पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्यांकडून पाकिस्तानी ड्रोनला रोखण्यात आलं. यावेळी अनेक स्फोटांचे आवाज वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू आले. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

याआधी गुरुवारी रात्री देखील काश्मीर खोऱ्यात ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. ७ मे रोजी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पहिल्यांदाच संशयित ड्रोन काश्मीरच्या हवाई हद्दीत घुसल्याची माहिती समोर आली. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितलं की, लष्कराच्या हवाई क्षेत्राला लागून असलेल्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमान तळाभोवती अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. यापूर्वी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील लष्कराच्या अवंतीपोरा हवाई तळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले होते.

दरम्यान, या स्फोटांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील विविध भागात वीज खंडित अर्थात ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. तसेच श्रीनगरमधील एका छावणीतील लष्कराच्या १५ व्या कॉर्प्स मुख्यालयाजवळ सायरन वाजले होते. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितलं की, उत्तर काश्मीरच्या सीमावर्ती बारामुल्ला जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. जिथे अनेक प्रमुख लष्करी छावण्या आहेत. खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी झालेल्या स्फोटांमुळे घबराट निर्माण झाली होती. सुरुवातीला एक स्फोट झाला आणि त्यानंतर वेगवेगळ्या दिशेने स्फोटांची मालिका सुरू झाली. एकाच वेळी हे अनेक ठिकाणी घडलं आणि हे स्फोट कुठे होत आहेत हे समजणं कठीण होतं, असं बारामुल्ला येथील एका रहिवाशाने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

जम्मूतही ऐकू आले स्फोटांचे आवाज

जम्मूमध्ये शुक्रवारी रात्री पुन्हा ब्लॅकआउट करण्यात आलं होतं, तसेच शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळाले. रात्री ८.३० च्या सुमारास शहरात स्फोटांचे आवाज देखील ऐकायला मिळाले. द इंडियन एक्सप्रेसने यांसंबंधीचे वृत्त दिले आहे. “जम्मूमध्ये आता ब्लॅकआउट आहे. शहरात सायरन ऐकू येत आहेत,” अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर पोस्ट करत दिली.