Khawaja Asif On India Pakistan Tension : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला होता. पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर जोरदार प्रत्त्युत्तर दिलं जाईल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हा इशारा दिला होता. तसेच ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचंही सिंह यांनी म्हटलं होतं.
राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यानंतर आता पाकिस्तानने भारताला इशारा दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ‘पाकिस्तान निर्णायक प्रत्युत्तरासाठी तयार आहे’, असं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटलं?
“पाकिस्तान कोणत्याही हल्ल्याला जलद, सुनियोजित आणि निर्णायक प्रत्युत्तर देईल. पहलगाम हल्ल्याची वर्षपूर्ती जवळ येत असताना अशा प्रकारे केली जाणारी वक्तव्ये ही ताकद नाही तर चिंता दर्शवतात. अशा प्रकारची धमकी देणं नवीन नाही. निराधार आरोपांच्या आडून राजकीय स्वार्थासाठी तणाव वाढवण्याचा प्रयत्न करणं हा एका अपेक्षित पद्धतीचा भाग आहे. पण पाकिस्तान शांतता आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे”, असं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे.
राजनाथ सिंह यांनी काय इशारा दिला होता?
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हटलं होतं की, “आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असं केल्यास भारताकडून जोरदार आणि तीव्र स्वरुपाचं उत्तर दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूर अद्याप समाप्त झालेलं नाही”, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. मात्र, यावेळी राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात थेट कोणत्याही देशाचं नाव घेतलं नव्हतं.
Addressing a ‘Sainik Samman Sammelan’ at Thiruvananthapuram. https://t.co/pFSgTYnmI4
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 2, 2026
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता. गेल्यावर्षी पहलमागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होतं. यात भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप समाप्त झालं नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.
