अमेरिका आणि इराणमधील युद्धात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. यावरून भारताने कोणतीही तक्रार किंवा आक्षेप घेतलेला नाही, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिली आहे. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या रुबियो यांनी स्पष्ट केले की, भारताची पाकिस्तानबाबतची चिंता ही प्रामुख्याने दहशतवादाशी संबंधित आहे.

‘भारताचा आक्षेप नाही’- मार्को रुबियो

मंगळवारी होणाऱ्या ‘क्वाड’ (Quad) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना रुबियो म्हणाले, “पाकिस्तानी भूमीवरून भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी संघटनांबद्दल भारताला नेहमीच चिंता असते. भारताने हा मुद्दा अनेकदा मांडला आहे. मात्र, अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानने बजावलेल्या मध्यस्थीच्या भूमिकेवर भारताने कोणताही आक्षेप घेतलेला नाही. भारताचा पाकिस्तानसोबतचा वाद पूर्णपणे वेगळा आहे.”

पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाशी अमेरिका पुन्हा जवळीक साधत असल्याच्या प्रश्नावर रुबियो यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, “जगातील इतर देशांशी आमचे व्यावहारिक पातळीवर संबंध आहेत, तसेच ते भारताचेही आहेत. पण आमचे इतर कोणत्याही देशासोबतचे संबंध हे भारतासोबतच्या धोरणात्मक भागीदारीच्या किमतीवर असू शकत नाहीत. हे सरकार पूर्ण होईपर्यंत भारत-अमेरिका संबंध इतिहासात सर्वाधिक मजबूत होतील.”

पाकिस्तानची मध्यस्थाची भूमिका

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमधील वाद मिटवण्यासाठी पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळेच गेल्या सहा आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील युद्धबंदी कायम आहे. या शांतता चर्चेला पुढे नेण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी नुकताच इराणचा दौराही केला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानच्या या भूमिकेचे कौतुक केले होते. “आम्ही केवळ पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या आग्रहास्तव हा युद्धबंदीचा निर्णय घेतला आहे,” असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

‘भारत माझ्यावर १०० टक्के विश्वास ठेवू शकतो’- ट्रम्प

दुसरीकडे, अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याशी फोनवर बोलताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे भरभरून कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि मी त्यांचा मोठा चाहता आहे. भारत माझ्यावर १०० टक्के विश्वास ठेवू शकतो.” या कार्यक्रमाला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो देखील उपस्थित होते.

मार्को रुबियो सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी आग्रा येथील ताजमहाल आणि जयपूरला भेट दिली आहे. मंगळवारी नवी दिल्लीत होणाऱ्या ‘क्वाड’ परिषदेत ते सहभागी होणार असून, यामध्ये इंडो-पॅसेफिक क्षेत्रातील सुरक्षेवर महत्त्वाची चर्चा होणार आहे.