Petrol Diesel Price Cut News: India slashes excise duty on fuel amid global energy crisis : अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेले युद्ध आणि इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा परिणाम जगभरात दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी १० रुपयांची कपात केली आहे. ज्यामुळे पेट्रोलवरील शुल्क ३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील शुल्क हे शून्य रूपये प्रति लिटर झाले आहे.

दरम्यान ही कपात झाली असली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा थेट फायदा ग्राहकांच्या होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणार नाहीत, कारण ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMC) या पेट्रोल पंपावरील विक्रीमध्ये त्यांना प्रति लिटरमागे होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी या कपातीचा वापर करून घेतील.

सध्या ब्रेंट क्रूडच्या वाढलेल्या किंमतींमुळे भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमागे ऑईल मार्केटिंग कंपन्यांना ४८.८ रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अमेरिका-इस्रायलचे इराणसोबतचे युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याने कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीने प्रति बॅरल १०० अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.

देशातील सर्वात मोठी खासगी किरकोळ इंधन विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्याच्या दुसर्‍याच दिवशी ही कपात करण्यात आली आहे. नायरा एनर्जीने पेट्रोलचे दर ५.३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ३ रुपये प्रति लिटरने वाढवले आहेत.

अमेरिका-इस्रायल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि त्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये केलेल्या नाकेबंदीमुळे पश्चिम आशिया मधून होणारी तेल आणि वायूच्या निर्यातीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याचा परिणाम जगभरात पाहायला मिळत आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी जगात सागरी मार्गाने होणाऱ्या एकूण कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्याचा सुमारे पाचवा हिस्सा, म्हणजेच दररोज साधारण २० ते २५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि सुमारे १० अब्ज क्यूबीक फूट गॅसची या अरुंद सागरी मार्गातून वाहतूक होत होती.