भारत पुढील वर्षी कोविड लसींचे ५ अब्ज डोस तयार करण्याचा प्रयत्न करणार, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले. तसेच जगाला राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण बनवण्यासाठी भारत आपलं योगदान देणं कायम ठेवणार आहे, असंही ते म्हणाले. लसींचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्याभारताने इतर देशांना कोविड लसींचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. भारतात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर देशातील लोकसंख्येला लस देण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या वर्षी एप्रिलमध्ये लसींची निर्यात थांबवण्यात आली होती.

CII पार्टनरशिप समिट 2021 मध्ये बोलताना गोयल म्हणाले की, “आपल्या देशातील लोकसंख्येचे लसीकरण करणे आणि उर्वरित जगाला लस पुरवणे या दोन्ही बाबती भारताने खूप चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. तसेच दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत, याचं भारतानं उत्तम उदाहरण घालून दिलंय. आम्ही आधी निर्यात करत आलो आहोत, आता देखील निर्यात करत आहो. आम्ही सर्वांसाठी लसी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करवून देण्यासाठी इतर देशांना आवश्यक तितक्या लसींचा पुरवठा करण्यास तयार आहोत.”

भारत इतर राष्ट्रांसोबत मिळून त्यांना वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे पुरवण्यात मदत करण्यासाठी काम करत आहे आणि भारतालाही अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळाल्याची कबुली गोयल यांनी कार्यक्रमात दिली.