नवी दिल्ली : “बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत निर्णायक भूमिका बजावत असून जग भारताच्या बाजूने झुकू लागले आहे,” असे ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी भारत-युरोपीय महासंघ आणि भारत-अमेरिका व्यापार करारांचा संदर्भ देत भारताचे वाढते जागतिक महत्त्व अधोरेखित केले.

अमेरिकेसोबत दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटीनंतर सोमवारी व्यापार सहमती झाली. आयातकर ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यावर तडजोड झाल्यानंतर काही तासांतच पंतप्रधानांनी भारताची जागतिक भूमिका स्पष्ट केली. अनिश्चिततेच्या काळातही भारत आपली ताकद दाखवू शकतो. हे करार जग भारताकडे कोणत्या नजरेने पाहते हेच दर्शवतात, असे मोदी म्हणाले.

भारत-युरोपीय महासंघ व्यापार कराराला त्यांनी ‘सर्व करारांची जननी’ संबोधले. या करारामुळे सामान्य नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

संसदेमध्ये झालेल्या रालोआच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत झाले. भाजपच्या खासदारांनी ‘जय मोदी’, ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा तसेच, भाजपचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितीन नवीनही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी खासदारांना संसदेत नियमित उपस्थित राहण्याचे, चर्चेत सक्रिय सहभाग घेण्याचे तसेच, सरकारच्या कामाची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. आगामी काळात या व्यापार करारांचा उपयोग देशांतर्गत उत्पादन, उच्च दर्जाच्या निर्मिती आणि औद्योगिक वाढीसाठी झाला पाहिजे, असे मोदी म्हणाले.

अधिवेशनादरम्यान पहिलीच बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ही रालोआच्या खासदारांची ही पहिलीच बैठक होती. यंदाच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. हा अर्थसंकल्प ‘भविष्याचा वेध घेणारा’ असून ‘विकसित भारत २०४७’ची स्पष्ट दिशा करणारा आहे, असे मोदी म्हणाले. बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच, विविध राज्यांतील विधानसभा निवडणूक विजयांमुळे आत्मसंतुष्ट न होता काम सुरू ठेवण्याचा संदेश पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांना दिल्याचे सांगितले.

अमेरिकेबरोबरचा करार हा सातत्यपूर्ण संयम आणि संतुलित धोरणाचा परिणाम आहे. वाढीव आया शुल्कांवरून टीका झाली, पण आम्ही संयम राखला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान