PM Modi Israel Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. मोदींचं बुधवारी इस्रायलमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे त्यांची पत्नी सारा यांच्यासह बेन गुरियन विमानतळावर उपस्थित होते.

यावेळी बेन गुरियन विमानतळावर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेतान्याहू यांच्या भेटीवेळी भगव्या रंगावरून झालेल्या संवादाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांच्या पत्नी सारा या भगव्या पोशाखामध्ये असल्याकडे लक्ष वेधलं.

नेमकं काय घडलं?

झालं असं की, बेन गुरियन विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी नेतान्याहू हे त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी विमानातून खाली उतरल्यानंतर नेतान्याहू यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नेतान्याहू यांच्या पत्नी सारा यांच्याशीही हस्तांदोलन केलं. यावेळी नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या पॉकेट स्क्वेअरच्या रंगाकडे आणि त्यांच्या पत्नी सारा यांच्या पोशाखाच्या रंगाकडे लक्ष वेधलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर देत म्हटलं की, “हो, हो… भगवा.” आणि तिघेही हसायला लागले आणि बेन गुरियन विमानतळावरील या क्षणांची जोरदार चर्चा रंगली.

‘दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी इस्रायलमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झालं. त्यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांच्यासह बेन गुरियन विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचा गेल्या नऊ वर्षांतील इस्रायलचा हा दुसरा दौरा आहे. जुलै २०१७ मध्ये मोदी इस्रायलमध्ये आले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला.

नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना आलिंगन दिलं. त्यानंतर विमानतळावर त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. नेतान्याहू आणि मोदी गुरुवारी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. इस्रायलच्या दौऱ्यापूर्वी जाताना मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, याची खात्री असल्याचे वक्तव्य केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होईल.