सोशल मीडियावर सध्या इंडिया पोस्टच्या (भारतीय डाक विभाग) नावाखाली ‘डाक सेवा गिफ्ट्स’ आणि बक्षीसे दिली जात असल्याचा एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट असून नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक्सवर क्लिक करू नये, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’च्या फॅक्ट चेक युनिटने दिला आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, इंडिया पोस्टतर्फे नागरिकांना मोफत गिफ्ट्स, सबसिडी किंवा लकी ड्रॉद्वारे बक्षीसे दिली जात आहेत. ही बक्षीसे मिळवण्यासाठी युजर्सना एका बाह्य लिंकवर क्लिक करण्यास आणि आपली वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जात आहे.
पीआयबी (PIB) फॅक्ट चेकचा खुलासा
या व्हायरल मेसेजची दखल घेत पीआयबीने ‘X’ वर अधिकृत पोस्ट करून हा दावा फेटाळला आहे. पीआयबीने स्पष्ट केले आहे की, इंडिया पोस्ट अशी कोणतीही योजना, लकी ड्रॉ किंवा बक्षीस वाटप करत नाही. या मेसेजशी डाक विभागाचा कोणताही संबंध नाही. हा केवळ नागरिकांची फसवणूक करण्याचा एक डाव आहे.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका; प्रशासनाचे आवाहन
अशा बनावट लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये मालवेअर (व्हायरस) शिरू शकतो किंवा युजर्सची ‘फिशिंग’ वेबसाईटवर दिशाभूल केली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. बँक खात्याची माहिती, एटीएम पिन, ओटीपी किंवा आधार-पॅन सारखी सरकारी ओळखपत्रे कोणाशीही शेअर करू नका. केंद्र सरकारशी संबंधित असा कोणताही संशयास्पद मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ आढळल्यास त्याची थेट ‘पीआयबी फॅक्ट चेक’ टीमकडे तक्रार करा. असे अधिकाऱ्यांनी नागरिकांना या गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
२०२२ मध्येही झाला होता असाच प्रयत्न
डाक विभागाच्या नावाने फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ मध्येही अगदी अशाच पद्धतीने खोट्या लिंक्स पसरवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेत सांगण्यात आले होते की, इंडिया पोस्ट सर्वेक्षणावर आधारित कोणतीही सबसिडी, बोनस किंवा बक्षीसे जाहीर करत नाही. नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांना प्रतिसाद देऊ नये.
अधिकृत चॅनेलचाच वापर करा
इंडिया पोस्ट कधीही मेसेज किंवा लिंक्स पाठवून नागरिकांकडून त्यांची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मागत नाही. डाक विभागाच्या सर्व अधिकृत घोषणा आणि योजना केवळ त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरच प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे हा मेसेज पुढे फॉरवर्ड न करता, कोणतीही माहिती नेहमी अधिकृत स्रोतांकडूनच पडताळून पहा, असे आवाहन करण्यात आले आहे.
