मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतासमोर इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. ही लढत वानखेडे स्टेडियमवर होणार असून यामध्ये यजमानांचे पारडे जड असेल, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव वगळल्यास सर्व सामन्यांत विजय नोंदवले आहेत. दुसरीकडे इंग्लंड संघानेही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल, असे वेंगसरकर यांना वाटते. भारताने ‘अव्वल आठ’ फेरीतील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजला नमवीत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या लढतीत संजू सॅमसनने भारताकडून निर्णायक खेळी केली.
‘पॉवरप्ले’मधील आक्रमण निर्णायक
‘‘ट्वेन्टी-२० प्रारूपात पहिल्या सहा षटकांना सामन्याचा पाया मानले जाते. या कालावधीत ६० ते ७० धावांची उभारणी झाली, तर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सोपी होते. मात्र सुरुवातीलाच २५-३० धावांवर गडी बाद झाल्यास संघावर दबाव वाढतो. त्यामुळे आक्रमकता आणि संयम यांचा समतोल साधत खेळणे भारतीय फलंदाजांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.
योग्य फटक्यांची निवड आवश्यक
‘‘केवळ आक्रमक फटकेबाजीपेक्षा योग्य फटक्यांची निवड केल्यास मोठी धावसंख्या उभारणे शक्य होऊ शकते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने दाखवून दिले की, योग्य फटक्यांची निवड आणि गडी हातात राखत खेळल्यास २०० धावांचा टप्पाही गाठता येतो. शेवटच्या तीन-चार षटकांत आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणणे ही भारताची ताकद ठरू शकते,’’ असे वेंगसरकर म्हणाले.
मधल्या षटकांतील नियंत्रण महत्त्वाचे
‘‘इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. चेंडू योग्य टप्प्यावर राखत धावगतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः मधल्या षटकांत इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कुलदीप यादवसारख्या गोलंदाजाला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाल्यास कदाचित इंग्लंडच्या अडचणी वाढू शकतात. पण, सध्याची स्थिती पाहता संघरचनेत मोठा बदल अपेक्षित नाही,’’ असे वेंगसरकर यांना वाटते.
इंग्लंडची फलंदाजी सक्षम
‘‘इंग्लंडचा संघ संतुलित आणि आक्रमक आहे. त्यांच्या फलंदाजी फळीमध्ये अनुभव आणि युवा खेळाडू यांचा सुरेख मेळ आहे. हॅरी ब्रूक यासारखा खेळाडू काही षटकांत सामन्याचे चित्र पालटू शकतो. त्यामुळे इंग्लंडला कमी लेखण्याची चूक भारताने करू नये,’’ असे वेंगसरकर म्हणाले.
