दिल्लीत आजही आंदोलन होणार आहे, राहुल गांधी त्याची तयारी करत आहेत. ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागेल. मला हे विचारायचं आहे की या सगळ्यात अमित शाह कुठे आहेत? नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे झाली आहेत म्हणून शेकडो कोटींच्या जाहिराती दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात दिल्या आहेत. हे पैसे वाचवले असते तर शेतकऱ्यांना मदत करता आली असती. पण जाहिरातबाजीवर देश चालला आहे. ही चमचेगिरी आहे, अशी चमचेगिरी हुकूमशहाला आवडते असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच इंडिया आघाडीच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

इंडिया आघाडीचा मोर्चा अभूतपूर्व होता

इंडिया आघाडीचा कालचा मोर्चा अभूतपूर्व होता. हा मोर्चा अडवण्यासाठी मोदी सरकारने मोठा फौजफाटा तैनात केला होता. मोर्चेकऱ्यांना अटकाव केला जात होता. पण आता ठिणगी पडली आहे. ही ठिणगी देशभर पसरणार आहे, असं सांगतानाच कालच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन करण्यात आलं असा आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्ञानेश कुमार आणि राजीव कुमार दोघंही भाजपाचे एजंट

ज्ञानेश कुमार आणि राजीव कुमार या दोघांनीही भाजपाचे एजंट म्हणून काम केलं आहे. आमचा पक्ष चोरांच्या हातात देण्याचं काम राजीव कुमारने केलं. ज्ञानेश कुमार आणि राजीव कुमार हे दोघंही देशाचे अपराधी आहे. तो कुठे फिरतोय आम्हाला सगळं माहीत आहे. ज्ञानेश कुमार कुठे जाणार आहे ते पण आम्हाला माहीत आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोग हायजॅक केला आहे. पण आता फार काळ चालणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी, ज्ञानेश कुमार आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देशाचे गद्दार आहेत.

इंडिया आघाडीच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन-संजय राऊत

दिल्लीत झालेलं विरोधी पक्षाचं आंदोलन हे संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत होतं. या मोर्चात बिगर भाजपा खासदार म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार होते. हा मोर्चा अभूतपूर्व म्हणावा असाच होता. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्यासह सगळ्याच प्रमुख पक्षांचे खासदार या मोर्चात होते. BSF चे जवान, दिल्ली पोलीस या सगळ्यांना आम्हाला रोखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. आम्ही जणू काही दहशतवादी आहोत अशा पद्धतीने हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा मोर्चा जर निवडणूक आयोगापर्यंत जाऊ दिला असता तर काय घडलं असतं? जर पावणेतीनशे खासदारांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत तर मग काय चोर लफंग्यांना भेटणार का? महिला खासदारांशी गैरवर्तन केलं, काहींना अटक करण्यात आली. रात्री ११.३० वाजता राहुल गांधींची सुटका झाली. देशभरात या आंदोलनाची ठिणगी पडली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.