पीटीआय, नवी दिल्ली
भारताने शुक्रवारी अमेरिकेचे भारतातील राजनैतिक अधिकारी जेसन मीक्स यांना समन्स बजावून भारतीय खलाशी असलेल्या व्यावसायिक नौकांवरील अमेरिकी लष्कराच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकी लष्कराने केलेले हल्ले स्वीकारार्ह नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाने या बाबत निवेदन काढले आहे.
अमेरिकेने भारतीय खलाशी असलेल्या व्यावसायिक नौकांवरील केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावले. मीक्स यांना बुधवारी रात्रीही समन्स बजावण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की मीक्स यांच्याकडे भारताकडून अमेरिकी हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. भारतीय खलाशी असलेल्या व्यावसायिक नौकांवरील अमेरिकेच्या नौदलाकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे असे हल्ले अस्वीकारार्ह असून, सध्याच्या कठीण परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात आणणे योग्य नसल्याचे भारताने म्हटले आहे. नागरिकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी अमेरिकेने यावर आवश्यक ते उपाय योजावेत, अशी मागणी भारताने केली आहे.
पंतप्रधानांच्या मौनावर राहुल गांधींची टीका
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या टिप्पणीत ते म्हणाले, ‘अमेरिकेच्या तीन जहाजांवरील हल्ल्यात तीन दिवसांत तीन भारतीय ठार झाले. आपल्या तडजोड केलेल्या पंतप्रधानांनी त्यावर एक शब्दही काढलेला नाही. ज्या वेळी कुठलीही परकी शक्ती भारतीयांची हत्या करते, तेव्हा पंतप्रधानांनी बोललेच पाहिजे. पण, ते कधीही एक शब्द बोलत नाहीत.’
पुढील आठवड्यात जी-७ देशांची परिषद आहे. खलाशांच्या झालेल्या मृत्यूंनंतर काहीच दिवसांत मोदीजी हसतील, आलिंगन देतील आणि करारही करतील. पण, ज्या तीन भारतीयांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी त्यांच्याकडे एक शब्दही नसेल. तडजोड केलेले पंतप्रधान भारतमातेच्या सुपुत्रांना वाचवू शकत नाहीत. ज्यांनी या सुपुत्रांचे बळी घेतले, त्यांचा सामना करण्याची पंतप्रधानांची ताकद नाही. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस
इराणकडूनही अमेरिकेच्या हल्ल्यावर टीका
दुबई : भारतीय खलाशी असलेल्या व्यावसायिक नौकांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा इराणने निषेध केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी शुक्रवारी अमेरिकेवर टीका करताना ‘अशा पद्धतीचे हल्ले जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करतात,’ असे म्हटले आहे. मृत खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि भारत सरकारप्रति त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेसाठी अमेरिकेला जबाबदार धरावे, असे आवाहन इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केले आहे.
