नवी दिल्ली : शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) गाठण्यामध्ये भारत जगामध्ये प्रथमच पहिल्या शंभर देशांत आला आहे. ‘एसडीजी’ निर्देशांकात भारताचे स्थान १६७ देशांमध्ये ६७ गुण कमावून ९९ वे असून, चीन ७४.४ गुणांसह ४९व्या, तर अमेरिका ७५.२ गुणांसह ४४ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान वगळता भूतान, नेपाळसह भारताचे सर्व शेजारी देश या निर्देशांकात भारताच्या पुढे आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास अहवालात भारताचे स्थान २०२४मध्ये १०९वे, २०२३मध्ये ११२वे, २०२२मध्ये १२१वे, २०२१मध्ये १२०वे, २०२०मध्ये ११७वे, २०१९मध्ये ११५वे, २०१८मध्ये ११२वे आणि २०१७मध्ये ११६वे होते. सध्या भारताच्या शेजारी देशांमध्ये भूतान ७०.५ गुणांसह ७४व्या स्थानी आहे. नेपाळ ६८.६ गुणांसह ८५व्या तर पाकिस्तान ५७ गुणांसह १४०व्या स्थानावर आहे. मालदीव आणि श्रीलंका अनुक्रमे ५३ आणि ९३ व्या स्थानावर आहेत.

‘एसडीजी’ संकल्पना २०१५पासून अस्तित्वात आली. २०३०पर्यंत सर्वसमावेशक विकासापासून कुणीही वंचित राहता कामा नये, हे उद्दिष्ट यामागे होते. यामध्ये विविध देशांना ० ते १००मध्ये त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले जातात. यामध्ये एकूण १७ उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. जागतिक स्तरावर ‘एसडीजी’मधील प्रगती थांबली असल्याचे निरीक्षण अहवालातील लेखकांनी नोंदवले आहे. २०३०पर्यंत ठरविण्यात आलेल्या १७ उद्दिष्टांपैकी केवळ १७ टक्के उद्दिष्टे साध्य होतील, अशी टिप्पणी अहवालाचे मुख्य लेखक अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी केली आहे. जगभरात सुरू असणारे संघर्ष, महसूल निर्मितीमध्ये मर्यादा आदी कारणांचा परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युरोपातील देशांचा डंका

या अहवालात युरोपातील देशांनी आपल्या कामगिरीतील सातत्य राखले आहे. फिनलंड पहिल्या क्रमांकावर असून, स्वीडन दुसऱ्या आणि डेन्मार्क तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या २० मधील १९ देश युरोपमधील आहेत. या देशांनाही हवामान, जैवविविधतेसह इतर उद्दिष्टे गाठण्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागल्याचे अहवालात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलद प्रगती करणारे देश

पूर्व आणि दक्षिण आशियातील देशांची कामगिरी चांगली झाली असून, उद्दिष्टे साधण्यामध्ये या देशांनी जलद प्रगती केली आहे. या देशांमध्ये नेपाळ, कंबोडिया, फिलिपिन्स, बांगलादेश आणि मंगोलियाचा समावेश आहे. जलद प्रगती करणाऱ्या इतर देशांमध्ये बेनिन, पेरू, संयुक्त अरब आमिराती, उझबेकिस्तान, कोस्टा रिका आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.