Official diplomatic update on US Iran Ceasefire and India’s stance on regional stability : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू होता. अखेर या दोन देशांमध्ये युद्धविरामावर एकमत झाले आहे. यानंतर भारताने बुधवारी या युद्धविरामाचे स्वागत केले असून या तात्पुरत्या युद्धविरामामुळे पश्चिम आशियामध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताने सातत्याने तणाव कमी करण्याच्या बाजूने भूमिका मांडली आहे. तसेच, सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी संवाद आणि डिप्लोमसी हे गरजेचे आहे, यावरही भारताने भर दिल्याचे मंत्रालयाने मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत सरकारने यावेळी संघर्षाचे मानवतावादी आणि आर्थिक परिणाम देखील अधोरेखित केले आहेत. या संघर्षामुळे लोकांना प्रचंड हाल सोसावे लागल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच जागतिक उर्जा पुरवठा आणि व्यापार साखळीमध्ये अडथळा आल्याचेही भारत सरकारने यावेळी नमूद केले आहे.
राजनैतिक मार्गांनी काढलेला शांततापूर्ण तोडगा हाच एकमेव व्यवहार्य मार्ग असल्याच्या आपल्या दीर्घकालीन भूमिकेचाही भारत सरकारने यावेळी पुनरुच्चार केला. तसेच यावेळी सागरी मार्गांचे महत्त्व अधोरेखित करताना परराष्ट्र मंत्रालयाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कुठल्याही निर्बंधाशिवाय जहाज वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह सुरू राहिल अशी भारताला अपेक्षा असल्याचेही नमूद केले.
भारताने नेमकं काय म्हटलं?
“आम्ही युद्धविरामाचे स्वागत करतो आणि आशा व्यक्त करतो की यामुळे पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांततेकडे घेऊन जाईल. आम्ही यापूर्वीही सातत्याने तणाव कमी करणे, चर्चा आणि डिप्लोमसी हे सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी आवश्यक असल्याचे समर्थन करत आलो आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.”
“या संघर्षामुळे लोकांचे आधीच प्रचंड हाल झाले आहेत. तसेच यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापर साखळी विस्कळीत झाली आहे. आम्हाला होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून कुठल्याही अडथळ्याशिवाय नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह सुरू राहणे अपेक्षित आहे.”
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, गेल्या काही आठवड्यांमध्ये या मार्गात अडथळे आल्याने जगभरातील ऊर्जा बजारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
