India Russia Relation : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. या युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होत आहे. जागतिक परिस्थितीचा विचार करता भारताने देखील आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. आता भारताने रशियाकडून चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली घेतली असून पुढच्या काही दिवसांत ही संरक्षण प्रणाली भारतात दाखल होणार आहे.
मागच्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान या ‘एस-४००’ प्रणालीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून पाकिस्तानी विमाने रोखण्यास मोठी मदत झाली होती, त्यामुळे या प्रणालीचं मोठं कौतुक करण्यात आलं होतं.
रशियन बनावटीची ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणाली ही जगातील सर्वात प्रगत प्रणालींपैकी एक असल्याचं मानलं जातं. अनेक देशांच्या लष्करी रणनीतीचा ही हवाई संरक्षण प्रणाली एक भाग बनली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान देखील या प्रणालीच्या अचूकतेची आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेची झलक पाहायला मिळाली होती.
एस-४०० संरक्षण प्रणाली भारतात कधी दाखल होणार?
दरम्यान, रशियन बनावटीची चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही हवाई संरक्षण प्रणाली भारतीय बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे. या बरोबरच पाचवी एस-४०० प्रणाली या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
रशियातून येणारी चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली ही राजस्थानात तैनात केली जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून भारतात येणाऱ्या या एस-४०० प्रणालीची तपासणी १८ एप्रिलपर्यंतच पूर्ण झाली होती. तसेच केंद्र सरकारने याआधी आणखी पाच ‘एस-४०० प्रणाली’ खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

भारत खरेदी करणार आणखी ५ रशियन S-400 प्रणाली
भारत रशियन एस-४०० (S-400) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या आणखी पाच स्क्वॉड्रन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान एस-४०० प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचा एस-४०० प्रणालीच्या आणखी पाच स्क्वॉड्रन खरेदी करण्याचा प्रस्ताव जाईल. भारताचे बहुस्तरीय हवाई संरक्षण नेटवर्क आणखी मजबूत करण्यासाठी ही प्रणाली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर तैनात केली जाणे अपेक्षित आहे. भारताकडे सध्या तीन एस-४०० प्रणाली आहेत, तर रशियाबरोबर २०१८ मध्ये झालेल्या पाच स्क्वॉड्रनच्या करारानुसार, या वर्षी आणखी दोन प्रणालींचा त्यामध्ये समावेश होणार आहे.
ही प्रणाली का खास आहे?
पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईदरम्यान, म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने प्रथमच एस-४०० चा यशस्वीपणे वापर केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील एअरबेस, रडार केंद्र आणि कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्सना लक्ष्य केलं होतं. यावेळी पाकिस्तानी लढाऊ विमाने, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यांना प्रभावीपणे काम करण्यापासून रोखल्याचं श्रेय भारतीय हवाई दलाने एस-४०० प्रणालीला दिलं होतं.

तसेच अधिकार्यांनी सांगितलं होतं की, या प्रणालीने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही देखील यशस्वीपणे रोखली. भारतीय हवाई दल आता हवाई आणि क्षेपणास्त्र धोक्यांपासून बचावासाठी एस-४०० इंटरसेप्टर्सची संख्या वाढवण्याच्या विचारात आहे.
एस-४०० सिस्टिममुळे भारताची ताकद वाढणार
एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे. एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील सर्व प्रकारच्या टार्गेटसना भेदण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० फायटर तसेच टेहळणी विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलला लक्ष्य करु शकते.
