भारत आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या अनुषंगानेच भारताने रशियाकडून चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली घेण्याचा निर्णय घेतला होता. आता ही चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली भारताला मिळाली आहे.‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान या ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणालीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगण्यात आलं होतं.

या हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून पाकिस्तानी विमाने, ड्रोन रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली होती. त्यामुळे या हवाई संरक्षण प्रणालीचं कौतुक करण्यात आलं होतं. ‘एस-४००’ ही हवाई संरक्षण प्रणाली रशियन बनावटीची असून जगातील सर्वात प्रगत प्रणालींपैकी एक असल्याचं मानलं जातं. अनेक देशांच्या लष्करी रणनीतीचा ही हवाई संरक्षण प्रणाली महत्वाचा भाग बनलेली आहे.

भारताने पाकिस्तानच्या विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या प्रणालीच्या अचूकतेची आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेची झलक पाहायला दिसून आली होती. भारताच्या लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षमतेला यामुळे मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. रशियन बनावटीच्या ‘एस-४००’ सुदर्शन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चौथी स्क्वाड्रन भारतात दाखल झाली आहे. आता ही हवाई संरक्षण प्रणाली लवकरच एका कार्यरत क्षेत्रात तैनात केली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

दरम्यान, रशियाबरोबर २०१८ मध्ये झालेल्या करारानुसार पाच ‘एस-४००’ स्क्वाड्रनपैकी ही चौथी स्क्वाड्रन भारतात दाखल झाली आहे. याआधी तीन स्क्वाड्रन भारतीय सशस्त्र दलांमध्ये आधीच कार्यरत आहेत. प्रत्येक एस-४०० स्क्वाड्रनमध्ये कमांड-अँड-कंट्रोल युनिट्स, प्रगत रडार आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक यांचा समावेश असतो. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये प्रत्येकी सहा प्रक्षेपक असलेल्या दोन बॅटरी असून त्यांमध्ये एकूण १२८ क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असते.

चौथ्या स्क्वाड्रनच्या आगमनामुळे भारताचं हवाई संरक्षण जाळं अधिक मजबूत झालं आहे. ‘एस-४००’ ही जगातील सर्वात प्रगत लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रणालींपैकी एक आहे. जी लढाऊ विमाने, निगराणी, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह विविध प्रकारच्या लक्ष्यांना शोधण्यास आणि त्यांचा मागोवा घेण्यास आणि त्यांच्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे.

भारताने २०१८ मध्येच रशियाबरोबर एकूण पाच स्क्वॉड्रनसाठी एस-४०० खरेदी करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार, याआधी तीन स्क्वॉड्रन सुमारे दोन वर्षांपूर्वी भारताला मिळाली होती. मात्र, मध्यंतरी रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे उर्वरित वितरणास विलंब झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता भारताला चौथी ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणाली मिळाल्याने आता मूळ करारानुसार फक्त एका युनिटचं वितरण बाकी आहे.

ही प्रणाली का खास आहे?

पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईदरम्यान, म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने प्रथमच एस-४०० चा यशस्वीपणे वापर केला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील एअरबेस, रडार केंद्र आणि कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्सना लक्ष्य केलं होतं. यावेळी पाकिस्तानी लढाऊ विमाने, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यांना प्रभावीपणे काम करण्यापासून रोखल्याचं श्रेय भारतीय हवाई दलाने एस-४०० प्रणालीला दिलं होतं.

तसेच अधिकार्‍यांनी सांगितलं होतं की, या प्रणालीने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही देखील यशस्वीपणे रोखली होती. भारतीय हवाई दल आता हवाई आणि क्षेपणास्त्र धोक्यांपासून बचावासाठी एस-४०० इंटरसेप्टर्सची संख्या वाढवण्याच्या विचारात असल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं.

एस-४०० ही प्रणालीमुळे भारताची ताकद वाढणार?

दरम्यान, एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे.

अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे. एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त ५ मिनिटात तैनात करता येते. तीन प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील सर्व प्रकारच्या टार्गेटसना भेदण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे.