करोना विषाणूसाथ पूर्णपणे आटोक्यात येत असल्याचे चित्र आणि मंकीपॉक्सच्या नव्या साथीची भीती या पाश्र्वभूमीवर गेल्या २४ तासांत देशात १९ हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळले आणि ४९ जणांचा मृत्यू झाला. करोना उद्रेकाच्या या नव्या चिंतेमुळे केंद्र सरकारने दिल्लीसह सात राज्यांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.

देशाच्या काही भागांत रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांना करोना निदान चाचण्यांची संख्या वाढवण्यासह नियमावलीचे पालन आणि लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. ‘‘देशाच्या विविध भागांत आगामी काळात गणेशोत्सवासह अनेक सार्वजनिक उत्सव आणि सण साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे तेथे करोनासह अन्य साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने राज्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रामुख्याने सात राज्यांना दिल्या आहेत,’’ असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी सांगितले.

देशात गेल्या २४ तासांत १९,४०६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या चार कोटी ४१ लाख २६ हजार ९९४ वर गेली, तर गेल्या २४ तासांत ४९ रुग्ण दगावल्याने करोनाबळींची आतापर्यंतची एकूण संख्या पाच लाख २६ हजार ६४९वर पोहोचली. मृतांमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी दोन, तर हरयाणा, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, नागालॅण्ड, ओदिशा, पंजाब, सिक्कीम, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी ०.३१ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर रोगमुक्त होण्याचा दर ९८.५० टक्के आहे. गेल्या २४ तासांत ५७१ रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. दैनंदिन रुग्णनिदान दर ४.९६ टक्के नोंदविला गेला, तर साप्ताहिक रुग्णनिदान दर ४.६३ टक्के आहे. रोगमुक्त रुग्णांची संख्या चार कोटी, ३४ लाख ६५ हजार ५५२ झाली आहे.

निर्देश काय?

* राज्यांनी चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि करोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन ही पंचसूत्री पुन्हा लागू करावी.

* बाजार, आंतरराज्य बस स्थानके, शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके, देवस्थाने आदी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापरण्याबाबत नव्याने सूचना जारी कराव्यात.

* लसीकरणाचा वेग वाढवून ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सवा’अंतर्गत ३० सप्टेंबपर्यंत सरकारी लसीकरण केंद्रावर नि:शुल्क ‘वर्धकमात्रा लसीकरणा’वर भर द्यावा.

* सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक रुग्णनिदान दर आणि रुग्ण समूह आढळणाऱ्या जिल्ह्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे. तेथे आरटीपीसीआर आणि प्रतिजन चाचण्यांना प्राधान्य द्यावे.

* करोना संसर्गाच्या लक्षणांतील काही बदल लक्षात घेता, इन्फ्लूएन्झासदृश संसर्ग (आयएलआय) आणि फुफ्फुसांचा अतिगंभीर संसर्ग (एसएआरआय) या आजारांच्या रुग्णांवर लक्ष ठेवावे, त्यांच्या करोना चाचण्या कराव्यात.  

* परदेशी प्रवाशांच्या नमुन्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारणावर भर द्यावा, तसेच अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागातील संशयित रुग्णांचे नमुने प्रयोगशाळांकडे पाठवावेत.

राज्यात १९३१ नवे बाधित

मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या २४ तासांत १९३१ नवे रुग्ण आढळले. मुंबईतील बाधितांच्या संख्येतही चार-पाच दिवसांपासून मोठी वाढ होऊ लागली असून दिवसभरात ४८६ नवे रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला.

आतापर्यंतचे मृत्यू : देशभरात आतापर्यंत पाच लाख २६ हजार ६४९ रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. त्याची राज्यनिहाय संख्या : महाराष्ट्र १,४८,१२९, केरळ ७०,५४८, कर्नाटक ४०,१५५, तमिळनाडू ३८,०३३, दिल्ली २६,३२७, उत्तर प्रदेश २३,५७४ आणि पश्चिम बंगाल २१,३८९. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक मृत्यू सहव्याधींमुळे झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र, दिल्ली, केरळमध्ये सर्वाधिक बाधित

राजधानी दिल्लीत ५ ऑगस्टला २,२०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळमध्ये गेल्या महिन्यात दररोज सरासरी २,३४७ रुग्ण आढळत होते, तर महाराष्ट्रात हे प्रमाण २,१३५ एवढे होते. राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यापासून रुग्णनोंदीचा दैनंदिन सरासरी दर उच्च आहे. गेल्या आठवडय़ाभरात देशभरात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये दिल्लीची रुग्णसंख्या ८.२ टक्के होती.

’राज्यांनी चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि करोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन ही पंचसूत्री पुन्हा लागू करणे.