पाक परराष्ट्रमंत्र्यांच्या हल्ल्याच्या दाव्यावर भारताचे प्रत्युत्तर 

भारत १६ ते २० एप्रिलदरम्यान पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करीत पाकिस्तानने रविवारी भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना समज दिली. तर पाकिस्तानच्या दाव्यामागे युद्ध उन्माद भडकवण्याचा हेतू आहे, अशी टीका भारताने केली.

पाकिस्तानचा दावा बेजबाबदार आणि निर्थक असल्याचे स्पष्ट करत भारताने तो सपशेल फेटाळला. भारताचे परराष्ट्र प्रवक्ते रवीशकुमार यांनी पाकिस्तानच्या दाव्यावर ‘पब्लिक गिमिक’ अशा शब्दांत टीका केली. अशा प्रकारची क्लृप्ती वापरून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतावर हल्ले करण्यास प्रोत्साहनच देत असल्याचा आरोप कुमार यांनी केला. सीमेपलीकडून होणारा दहशतवादी हल्ला मोडून काढण्याचा अधिकार भारत राखून ठेवत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी मुलतानमधील पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर भारत पुन्हा हल्ला करण्याचा दावा गुप्तचरांच्या हवाल्याने केला होता. पाकिस्तानी सरकारकडे विश्वासार्ह गुप्तचरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारत आणखी एका हल्ल्याची योजना तयार करत आहे. अशा प्रकारचा हल्ला भारत करू शकतो. त्यामागे पाकिस्ताविरोधात वातावरणनिर्मिती करून राजनैतिक दबाव वाढवण्याचा भारताचा हेतू आहे, असा दावा कुरेशी यांनी केला होता.