संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांच्यासाठी महागडं ठरलं. भारताने पाकिस्तानला ‘दहशतवादाचा गढ’ आणि ‘आश्रयस्थान’ असल्याचं संबोधत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा आणि त्यांना शहीदांचा दर्जा देणारा असा देश आहे, असं म्हणत भारतानं पाकिस्तानच्या मुद्द्यांचं खंडन केलं. विदिशा मैत्रा यांनी संयुक्त राष्ट्रात भारताची बाजू मांडली. त्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव आहेत.

“आज जे आपण ऐकलं ते चे भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर पाकिस्तानच्या प्रतिनिधींद्वारे कधीही न संपणाऱ्या काल्पनिक गोष्टी आहेत. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रात जर कोणत्या गोष्टीची चर्चा झाली तर ती दहशतवादाचा सामना कसा करायला हवा यावर झाली पाहिजे. संयुक्त राष्ट्राचा हा अजेंडा अद्याप पूर्ण झाला नाही,” असं विदिशा मैत्रा म्हणाल्या.

आणखी वाचा- संयुक्त राष्ट्रामुळे आज जग अधिक योग्य स्थितीत : पंतप्रधान मोदी

“पाकिस्तान हा असा देश आहे जो दशतवादाचा जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त केंद्र आहे. पाकिस्तान स्वत: दहशतवाद्यांना प्रशिक्रण देतो आणि त्यांना शहीदांच्या रूपात मान्यताही देतो. याव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये जातीयवाद आणि अल्पसंख्यांकावरही अत्याचाराचे प्रकार घडत आहेत,” असं त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये मैत्रा यांनी उत्तर देण्याच्या अधिकाराअंतर्गत पाकिस्तानच्या प्रतिनिधींच्या वक्तव्यावर उत्तर दिलं.