संसदेवर २००१मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदेच्या संकुलात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी वीरांना श्रद्धांजली वाहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहांतही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि अन्य सदस्य या वेळी उपस्थित होते. भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही या वेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
सचिन ठरला ‘मॅन ऑफ द अलायन्स’
संसदेच्या प्रांगणात आज एक अभूतपूर्व युती झाली. काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्षाची. या युतीचा ‘मॅन ऑफ द अलायन्स’ होता ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर. सचिन आला नि त्याच्याभोवती साऱ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे कोंडाळे जमले. यात होते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार. बारा वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सचिन उपस्थित होता.  प्रत्येकाशी सचिन हसतमुखाने बोलत होता. सचिनच्या उपस्थितीमुळे एक अनुपम्य युती संसदेच्या आवारात झाली. विषय होता क्रिकेट. सचिनच्या खेळाविषयी, त्याच्या विनम्रतचे कौतुक सुषमा स्वराज यांना वाटून गेले. सचिनशी बोलण्यासाठी त्या पुढे आल्या. तेवढय़ात सोनिया गांधीदेखील पुढे आल्या. पहले ‘आप’ म्हणून स्वराज यांनी सोनिया गांधी यांना विनंती केली. सोनिया गांधी, नही पहले ‘आप’ म्हणून जराशा मागे हटल्या. तेवढय़ात ‘रांगेत’ असलेले मुलायमसिंह यादव पुढे आले. अर्थात राहुल गांधी यांनीच त्यांना सन्मानाने पुढे आणले होते.