India vs Pakistan over Waqf Amendment Act : वक्फ कायद्याविरोधात देशातील काही भागांमध्ये आंदोलनं चालू आहेत. पश्चिम बंगालमध्ये दंगली चालू आहेत, तर काही भागांमध्ये तणावाची स्थिती आहे. अशातच भारताचा शेजारी देश, पाकिस्तानने या कायद्यावरून भारतावर टीका केली होती. मात्र, पाकिस्तानच्या प्रतिक्रियेला केराची टोपली दाखवत भारताने त्यांना जशात तसं प्रत्युत्तर दिलं आहे. “इतर देशांना उपदेश देण्याऐवजी आपल्या देशातील अल्पसंख्याकांची स्थिती बघा. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याच्या बाबतीत तुमचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे, ते आधी बघा”, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला उत्तर दिलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी वक्फ कायद्यावरील पाकिस्तानची टिप्पणी पूर्णपणे निराधार आहे, असं म्हटलं आहे. तसेच ते म्हणाले, “आमच्या शेजाऱ्यांना आमच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. भारतीय संसदेने मंजुर केलेल्या वक्फ सुधारणा कायद्यावर पाकिस्तानने केलेल्या निराधार व प्रेरित टिप्पण्या आम्ही स्पष्टपणे नाकारतो.”

आधी तुमच्या देशातील अल्पसंख्याकांची स्थिती बघा : रणधीर जायसवाल

रणधीर जायसवाल मंगळवारी (१५ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधिंनी त्यांना पाकिस्तानच्या वक्फ कायद्यावरील टिप्पणीवर प्रतिक्रिया विचारली असता जायसवाल म्हणाले, “पाकिस्तानला भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या संरक्षणाबाबत पाकिस्तानने इतरांना उपदेश देण्याऐवजी त्यांच्या अंतर्गत गोष्टींकडे लक्ष द्यावं. तिथली परिस्थिती बिकट असताना त्यांनी इतर देशांमधील घडामोडींवर बोलू नये.”

पाकिस्तानने काय म्हटलं होतं?

पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. हा कायदा मुस्लिमांना मशिदी व दर्ग्यांसह त्यांच्या संपत्तीतून बेदखल करण्याचा प्रयत्न असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. पाकिस्तानने म्हटलं होतं की “वक्फ कायदा हा भारतीय मुसलमानांच्या धार्मिक व आर्थिक अधिकारांचं उल्लंघन आहे. या कायद्यामुळे भारतीय मुसलमान मुख्य प्रवाहापासून आणखी बाहेर ढकलले जातील.”

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनांना हिंसक वळण

पश्चिम बंगालमध्ये अनेक मुस्लीम संघटना वक्फ कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं चालू आहेत. जाळपोळ व दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. या दंगलींमुळे मुर्शिदाबाद व आसपासच्या भागातील ५०० हून अधिक हिंदूंना घर सोडून पलायन करावं लागलं आहे. दरम्यान, या हिंसाचारात कथित बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.