नवी दिल्ली : जगभर चिंतेस कारण ठरलेल्या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली. या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.

‘ओमायक्रॉन’चे कर्नाटकातील दोन्ही रुग्ण पुरुष आहेत. त्यांचे वय ६६ आणि ४६ वर्षे आहे. दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, तीव्र लक्षणे नोंदवण्यात आलेली नाहीत. तसेच या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात यश आले असून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि  लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले. घाबरून जाण्याची गरज नाही, पंरतु त्याविषयी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. करोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. तसेच लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून, संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असेही केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जगभरात २९ देशांमध्ये ओमायक्रॉनचे ३७३ बाधित आढळले आहेत. करोनाचा हा नवा विषाणू आधीच्या डेल्टासह अन्य विषाणूंपेक्षा अधिक घातक आहे की कमी, हे अद्याप संशोधनातून स्पष्ट व्हायचे आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देऊन सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा संसर्ग चिंता वाढवणारा असल्याचे म्हटले होते.  

भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या विभागीय संचालक पूनम खेत्रपाल सिंह यांनी, जगातले सर्व देश एकमेकांशी जोडलेले असल्याने असे रुग्ण सापडणे हे अनपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व देशांनी परिस्थितीवर लक्ष ठेवणे, सतर्क राहणे, परदेशातून येणाऱ्यांचा वेगाने शोध घेणे आणि विषाणूचा फैलाव रोखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी ‘ओमायक्रॉन’बाबत चर्चा केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी आरोग्य कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा (बुस्टर डोस) देण्याबाबतही चर्चा केली, असे बोम्मई यांनी  सांगितले.  गेल्या आठवडय़ात भारतासह दक्षिण आशियात उर्वरित जगाच्या तुलनेत ३.१ करोना रुग्ण आढळल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

लसीकरणाची स्थिती

देशातील ८४.३ टक्के प्रौढ नागरिकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतल्याचे तर ४९ टक्के प्रौढ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.

परदेशांतून आलेले २५ प्रवासी बाधित

मुंबई: आफ्रिकेसह अन्य देशांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांपैकी २५ जण करोनाबाधित असल्याचे आढळले. यांच्या सहवासातील तीन जणांना करोनाची बाधा झाली असून, एकूण २८ जणांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८६१ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी तीन जण बाधित असल्याचे आढळले.

संपर्कातील पाच जण करोनाबाधित

* ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण हा बंगळूरु येथील खासगी रुग्णालयातील ४६ वर्षीय डॉक्टर आहे. त्याने परदेशी प्रवास केलेला नाही.

* त्याच्या संपर्कातील पाचजणही करोनाबाधित आढळले आहेत. त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर त्यांना ओमायक्रॉन आहे की नाही, स्पष्ट होईल.

एक रुग्ण परदेशी

कर्नाटकात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांपैकी ६६ वर्षांचा रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. भारतात आल्यानंतर गेल्याच आठवडय़ात हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेत परतला.

जोखमीच्या देशांतून येणाऱ्यांचेच विलगीकरण

मुंबई : परदेशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्राच्या आदेशाबाबत केंद्राने आक्षेप घेतल्यानंतर सरसकट सर्व देशांऐवजी जोखमीच्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण करण्याचा सुधारित आदेश गुरुवारी राज्य सरकारने जारी केला. दक्षिण आफ्रिका, झिंब्बाब्वे आणि बोट्सवाना या सध्याच्या जोखमीच्या देशांमधून (हाय रिस्क कंट्रीज) येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे १४ दिवसांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.