नवी दिल्ली : देशातील उपचाराधीन रुग्णांत २१६ दिवसांमधील म्हणजेच सात महिन्यांतील मोठी घट झाली आहे. २ लाख ०३ हजार ६७८ रुग्णसंख्या गुरुवारी नोंदली गेली. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.६० टक्के इतकी आहे. मार्च २०२० नंतर ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्ण संख्या आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.०७ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.

दैनंदिन रुग्णसंख्येतही किंचित घट झाली असून गेल्या २४ तासांत १६,८६२ रुग्णांची नोंद झाली तर ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २१ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही ३० हजारांखाली तर सलग ११० दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४० लाख ३७ हजार ५९२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५१ हजार ८१४ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या २९०८ ने कमी झाली आहे. 

रशियामध्ये करोना मृतांची संख्या चिंताजनकमॉस्को : रशियामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला असून  आरोग्य संस्थेवर ताण येत आहे. गेल्या २४ तासांत ३२,१९६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ९९९ जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाचा मंदावलेला दर आणि अर्थव्यवस्थेला पंगू बनवतील म्हणून कठोर निर्बंध घालण्याबाबत अधिकारी अनुत्सुक असल्याने दैनंदिन मृत्यूच्या संख्येने गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठला आहे. १४ कोटी ६० लाख लोकसंख्येपैकी केवळ २९ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.