सातत्याने गेले अनेक दिवस देशातील करोनास्थिती नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. करोनाबाधितांच्या आकड्यात दररोज होणारी घट हे निश्चितच दिलासादायक आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज (६ ऑक्टोबर) दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ८३३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सद्यस्थितीत देशात २ लाख ४६ हजार ६८७ सक्रिय करोना रुग्ण आहेत. हा गेल्या २०३ दिवसांतील सर्वात लहान आकडा आहे.

मंगळवारी (५ ऑक्टोबर) देशात १८ हजार ३४६ नवीन करोना प्रकरणांची नोंद झाली आहे. ही गेल्या २०९ दिवसांतील ही सर्वात कमी नोंद होती. तुलनेने आज हा आकडा वाढलेला दिसतो.

महाराष्ट्राची आकडेवारी

राज्यात मंगळवारी (५ ऑक्टोबर) रात्री आलेल्या आकडेवारीनुसार, २ हजार ८४० रूग्ण करोनामुक्त झाले. तर याच एका दिवसात २ हजार ४०१ नवीन रूग्ण आढळले. या २४ तासांत ३९ रूग्णांना करोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. राज्यात मंगळवापर्यंत एकूण ६३ लाख ८८ हजार ८९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.