देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्याने दररोज वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या आकड्याकडे विशेष लक्ष असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१३ सप्टेंबर) जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार २५४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात तब्बल ३७ हजार ६८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत देशात करोनामुळे २१९ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे, देशातील करोना मृत्यूंचा एकूण आकडा आता ४ लाख ४२ बाजार ८७४ वर गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील आतापर्यंत एकूण ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी आतापर्यंत एकूण ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्याचसोबत, सद्यस्थितीत देशात ३ लाख ७४ हजार २६९ इतके रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांतील आकडेवारीत नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांचा आकडा अधिक आहे. निश्चितच ही बाब अत्यंत दिलासादायक असून येत्या काळात देखील परिस्थिती अधिकाधिक नियंत्रणात राहावी यासाठी खबरदारी घेणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरण

देशातील करोना प्रतिबंधक लसीकरणाचा अधिकृत आकडा पहिला तर, गेल्या २४ तासांत ५३ लाख ३८ हजार ९४५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एकूण ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ जणांना लस दिली गेली आहे.