देशभरात करोना महमारीची तिसरी लाट आलेली असून, दैनंदिन रूग्ण संख्या आता साडेतीन लाखाच्या जवळ पोहचली आहे. शिवाय, ओमायक्रॉनबाधित रूग्ण देखील वाढत आहेत. तर, करोना रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. देशभरात मागील २४ तासात ३ लाख ४७ हजार २५४ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ही संख्या कालच्या संख्येपेक्षा २९ हजार ७२२ रूग्णांनी जास्त आहे. तसेच, ७०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

याशिवाय मागील २४ तासात २ लाख ५१ हजार ७७७ रूग्ण कोरनामुक्त देखील झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या २०,१८,८२५, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १७.९४ टक्के आहे. याशिवाय ९ हजार ६९२ ओमायक्रॉनबाधितही आढळले आहेत. कालपेक्षा ४.३६ टक्के वाढ झालेली आहे.

दरम्यान,

करोना प्रतिबंधक तिसरी मात्रा (वर्धक मात्रा) ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूशी लढा देण्यात उपयुक्त असल्याची माहिती ‘द लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. वर्धक मात्रेमुळे प्रतिपिंडे तयार होत असून ओमायक्रॉनला निष्प्रभ करण्यात ही प्रतिपिंडे प्रभावशाली असल्याचे दिसून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.