देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा एकूण आकडा ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान, या एका दिवसातील नव्या करोना रुग्णांचा आकडा हा करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ इतके रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात ४६० इतक्या लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता थेट ४ लाख ३९ हजार २० वर पोहोचला आहे. त्यामुळे, निश्चितच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

केरळची स्थिती चिंताजनक

केरळमध्ये करोनाचा संसर्ग चिंताजनक प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. कारण, देशात २४ तासांत नोंद झालेल्या ४१ हजार ९६५ नव्या करोनाबाधितांपैकी ३० हजार २०३ रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. तर या एका दिवसांतील ४६० मृत्यूंपैकी ११५ मृत्यू केरळमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात मंगळवारी (३१ ऑगस्ट) ४ हजार १९६ नवे करोनाबाधित आढळून आले आहे. तर ४ हजार ६८८ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. याच एका दिवसात राज्यात १०४ करोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० करोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्क्यावर पोचोचला आहे.